सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
4

पुणे, दि. २: सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे. कमी पावसामुळे कुकडी प्रकल्पात सध्या कमी पाणी साठा आहे. तथापि, पिण्यासाठी पाणी सोडणे आवश्यक असून सध्याचे सुरू असलेले कुकडी डावा कालव्याचे आवर्तन दोन दिवसांनी वाढवून १० सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवावे, असा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुकडी प्रकल्प व घोड संयुक्त प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीत घेण्यात आला.

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, बबनराव पाचपुते, अतुल बेनके, अशोक पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,  पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, पावसाच्या मोठ्या खंडामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाण्याचे योग्य नियोजन करावे.  या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगांना पाणी दिले जाते. पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात. त्यामुळे सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे. विसापूर जलाशयात अतिशय कमी पाणीसाठा असून पिण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीने कुकडी कालव्याचे पाणी २ दिवस अधिक सुरू ठेऊन विसापूरमध्ये पाणी सोडावे.

घोड प्रकल्पात सध्या केवळ २३ टक्के पाणीसाठा आहे. तथापि, पिण्यासाठी घोड धरणात आवश्यक पाणी आरक्षण ठेवून घोड धरणातून  कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणी सोडणे आवश्यक असून त्याप्रमाणे पाणी सोडावे, असेही पालकमंत्री म्हणाले.

यावेळी पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत महसूलमंत्री श्री. विखे पाटील आणि सहकारमंत्री श्री. वळसे पाटील यांनी तसेच उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या. बैठकीच्या सुरवातीला कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा व नियोजनाबाबत सादरीकरण केले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here