स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ३ : स्थानीय लोकाधिकार समितीने भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले. या समितीच्या कामकाजाची माहिती खासदार गजानन कीर्तिकर यांनी अतिशय वस्तुनिष्ठ  पद्धतीने पुस्तकरूपाने प्रकाशित केली आहे. सध्याच्या कार्यकर्त्यांना ही माहिती प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

हॉटेल सहारा स्टार येथे खासदार श्री. कीर्तिकर यांचा ५७ वर्षांचा राजकीय प्रवास आणि लोकाधिकार चळवळीच्या लढ्याच्या घटनाक्रमावर आधारित ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, सर्वश्री खासदार प्रतापराव जाधव, राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार आनंदराव अडसूळ, राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे, बांधकाम व्यावसायिक संजय कुलकर्णी आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, खासदार श्री. किर्तीकर यांचा पुस्तक प्रकाशन समारंभ हा कौटुंबिक समारंभ आहे. स्थानीय लोकाधिकार समितीचा इतिहास त्यांनी सांगितला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आम्हा सर्वांना मिळाली. मराठी माणसांना नोकरी मिळावी यासाठी त्याकाळी स्थानीय लोकाधिकार समितीने काम केले. ते आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले.

भूमिपुत्रांच्या हक्कासाठी स्थानीय लोकाधिकार समितीने काम केले. संघर्ष करून न्याय मिळवून देण्याचे काम केले. जीवाला जीव देणारे कार्यकर्ते या समितीने जोडले. शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारी संघटना म्हणून स्थानीय लोकाधिकार समितीची ओळख असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुंबईच्या विकासासाठी आम्ही काम करत आहोत. नीती आयोगाने मुंबई विकासासाठी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. विविध यंत्रणांना एकत्र आणून रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार आहोत. मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री श्री. राणे म्हणाले की, खासदार गजानन किर्तीकर हे अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे. मराठी माणसांच्या हक्कासाठी त्यांनी खूप काम केले. सरकारी, निमसरकारी कार्यालयात मराठी माणसांना न्याय देण्यासाठी त्यांनी काम केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, केंद्रीय मंत्री श्री. राणे यांच्या हस्ते खासदार श्री. कीर्तिकर आणि पुस्तक निर्मितीत सहकार्य करणाऱ्या पत्रकार योगेंद्र ठाकूर, पुस्तक सजावटकार सतीश भावसार, आदिती बोकील, सुलभा तेरणीकर, मनीषा राणे, संदीप कानसे, उदय सावंत, शिरीष साटम. ॲड. गौरव कळमकर, भाऊ तोरसेकर आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला. एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, बांधकाम व्यावसायिक संजय कुलकर्णी यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. श्री. कराड यांच्यावतीने महेश साने यांनी हे मानपत्र स्वीकारले.

खासदार गजानन कीर्तिकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. डॉ. बोरसे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

०००