पालकमंत्र्यांच्या हस्ते दारव्हा तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

यवतमाळ, दि.4 (जिमाका) : दारव्हा तालुक्यातील बोरी (बु), किन्ही वळणी, शेलोडी आणि शहरातील हजरत बाबा मस्तानशाह दर्गा ट्रस्ट येथील विविध विकासकामांचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.

बोरी (बु) येथे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ९ लाख ९९ हजार रक्कमेचे प्राथमिक शाळा खोली बांधकाम, आमदार निधी अंतर्गत १० लाखांच्या वाघामाई मंदिर सभागृह बांधकाम, जल जीवन मिशन अंतर्गत ३७ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा विहिर व टाकी बांधकाम, दलित वस्ती अंतर्गत ४ लाख रक्कमेचे पेव्हर ब्लॅाक बसविणे आणि ३ लाखांचे सिमेंट काँक्रीट नाली बांधकाम अशा विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.

किन्ही वळणी येथे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ७१ लाख ६२ हजार रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन तर जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता, शाळा दुरुस्ती, जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमी पोच रस्ता अशा एकूण ९९ लाख ६२ हजार रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले.

शेलोडी येथे २५ लाखांचे गौळपेंड शेलोडी रस्ता सुधारणाचे काम, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ११ लाख २५ हजार रक्कमेच्या अंगणवाडीचे बांधकाम व ९ लाख ९९ हजार रुपये रक्कमेचे नवीन वर्गखोली बांधकाम, संत सेवालाल महाराज मंदिराचे सौंदर्यीकरण, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या ठिकाणी सौंदर्यीकरण ५ लाख, प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्ती १५ लाख इतक्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. तर नळ पाणी पुरवठा योजना ५३ लाख ५१ हजार, नवीन वर्गखोली बांधकाम ९ लाख ९१ हजार, सामाजिक सभागृह १० लाख, अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता बांधणे ४ लाख, जनसुविधा योजनेंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधणे १० लाख या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

दारव्हा शहरातील हजरत बाबा मस्तान शाह दर्गा ट्रस्टच्या खुल्या जागेवर सांस्कृतिक भवनाच्या ५० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. दारव्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री म्हणाले, “ग्रामीण भागातील सार्वजनिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हा विकास आराखड्यात शहर व ग्रामीण भागातील कामांचे नियोजन केले जाणार आहे.

जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी ५०० कोटीची तरतूद केली आहे. बंधारा, नाला सरळीकरण व खोलीकरणाची कामे केली जाणार आहेत. अनेक गावात पांदण रस्त्यांची अडचण आहे. पांदण रस्त्यांसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. गावातील रस्ते, नळ पाणी पुरवठा योजनांची कामे केली जाईल. दलित वस्तींचा विकास, तांडा वस्ती सुधार योजनेमार्फत विकासकामे केली केली जाईल. नागरिकांनी गावातील नवीन विकासकामे सूचवावेत. आरोग्य शिबीरांतून मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जात असून याचा गरजूंना लाभ झाला आहे.

घरकूलांसाठी राज्यात येत्या काळात ओबीसी, विजाभज नागरिकांसाठी राज्यात १० लाख घरे बांधण्याचे टार्गेट आहे. याबाबत लवकरच कार्यवाही सुरु होईल. प्रधानमंत्री घरकूल योजनेबाबत केंद्रस्तरावर युद्धपातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे. वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात मृद व जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे केली जाणार आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात लवकरच कोट्यवधींची गुंतवणूक येणार आहे. यातून तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे,”असे पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कालिंदा पवार, जिपचे माजी शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, दारव्हाचे तहसिलदार विठ्ठल कुमरे, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, कार्यकारी अभियंता श्री.उपाध्ये, महावितरणचे उपअभियंता आशिष राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष राठोड, उपसभापती सुशांत इंगोले, माजी नगराध्यक्ष बबन इरवे, सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००