क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे उद्या वितरण

मुंबई, दि. 4 – शालेय शिक्षण विभागामार्फत सन 2022-23 च्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे मंगळवार दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षक दिनी वितरण करण्यात येणार आहे. हा समारंभ दि. 5 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 4 वाजता टाटा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए), नरीमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, आमदार कपिल पाटील, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आदी उपस्थित राहतील.

समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यामध्ये प्राथमिक प्रवर्गात 37, माध्यमिक प्रवर्गात 39, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) 19, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार आठ, विशेष शिक्षक कला/ क्रीडा दोन, दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक एक आणि स्काऊट – गाइड साठी दोन असे एकूण 108 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात येणार आहे.

सदर राज्य पुरस्कृत शिक्षकांना एक लाख दहा हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/