अमरावतीत साकारणार नवीन विभागीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत

अमरावती, दि. 8 : विभागीय आयुक्त कार्यालयाची जुनी शिकस्त इमारत तोडण्यात येणार असून त्याठिकाणी नवीन विभागीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बांधकाम करण्यात येणाऱ्या जागेची व अनुषंगिक नियोजनाची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज केली. नवीन इमारतीचे बांधकाम कुठल्याही उणीवा न ठेवता, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे, असे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकामासंबंधी आढावा डॉ. पाण्डेय यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. सामान्य प्रशासन उपायुक्त संजय पवार, तहसीलदार वैशाली पाथरे, संतोष काकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, सहायक अभियंता तुषार काळे यांच्यासह कार्यान्वयन यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, विभागीय आयुक्त कार्यालयाची जुनी शिकस्त इमारत पाडण्याचे काम नागरिकांना व कर्मचाऱ्यांना धुळीचा त्रास न होता, अगदी सुरक्षित व सुरळीतपणे करण्यात यावे. सभागृह क्रमांक एक व दोन मध्ये साउंड सिस्टम, एलईडी टि.व्ही. तसेच व्हिडीओ कॉन्फरसिंगकरिता प्रोजेक्टर इत्यादी यंत्रसामुग्री बसविण्यात यावीत. कार्यालयातील कंट्रोल पॅनलमधील चेंज ओव्हर बदलविण्यात यावे. कार्यालयातील सर्व स्वच्छतागृहांत एक्झॉस्ट फॅन बसविण्यात येऊन दर महिन्याला स्वच्छतेचा व किरकोळ दुरुस्तीचा आढावा घेण्यात यावा. दिव्यांग व्यक्तींना कार्यालयात येणे-जाणे सोयीचे होण्यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

            यावेळी विभागीय आयुक्तांनी इमारत बांधकाम करण्यात येणाऱ्या जागेची तसेच बैठक सभागृहाची व तेथील सोयी-सुविधांची पाहणी केली.