शासन आपल्या दारी उपक्रमामुळे कामगारांना मिळाली सुरक्षेची हमी…

‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा मुख्य उद्देश हा शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरीत मिळावा हाच आहे. सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन आता थेट जनतेच्या दारी येत आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या संकल्पनेतून राज्यात हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

धुळे जिल्ह्यात 10 जुलै, 2023 रोजी भव्य जिल्हास्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच जिल्हा सरकारी कामगार अधिकारी, धुळेमार्फत कामगारांना जोखमीचे काम करीत असतांना कामगारास शारिरीक इजा होऊ नये याकरिता मंडळामार्फत शासन आपल्या दारी कार्यक्रमात 1 हजार 19 सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले. या योजनेचा धुळे जिल्ह्यातील वंदना पांडुरंग पाटील (कापडणे, ता. धुळे), मंगलबाई संतोष पाटील (बाळापूर, ता.धुळे), विध्याबाई राकेश पाटील, (सौदाणे, ता. धुळे), भाऊसाहेब बापू मासुळे (गोताणे, ता.धुळे), नानाभाऊ शालिग्राम वाघ, नानाभाऊ पाटील (सैताळे, ता. जि. धुळे), आशा पाटील, मगंलाबाई निंबा पाटील (माळीच, ता. शिंदखेडा) यांच्यासह इतर नोंदणीकृत कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संचाचा लाभ मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीनं अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळाल्यामुळे आता बांधकाम साईटवर काम करताना त्यांना सुरक्षेची हमी मिळाली असल्याची भावना संबंधितानी व्यक्त केली आहे. कामगार विभागाच्यावतीने अत्यावश्यक संचामध्ये चटई, जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल, बॅटरी, मच्छरदाणी व बॅग दिली जाते. तर सुरक्षा संचात हेल्मेट, रिफ्लेक्टिव जॅकेट,सेप्टी हार्नेस, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट, एअर प्लॅग, मास्क व सेप्टीहॅन्ड ग्लोज अस साहित्य दिलं जाते. मजुरी काम करणाऱ्या बांधकाम कर्मचाऱ्यांना 10 हजार 240 रूपये किंमतीचे हे साहित्य घेणं परवडणारं नसतं त्यामुळे कोणत्याही सुरक्षा साहित्याविना कामगार काम करतात. आता मात्र कामगार विभागाने हे साहित्य दिल्याने कामगार हरखून तर गेलेच आहेत पण त्यांना सुरक्षाही मिळालयाने त्यांनी शासनाचे आभार मानले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करणे आवयक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी https://mahabocw.in तसेच जवळच्या जिल्हा सरकारी कामगार कार्यालयात संपर्क साधावा.

 

जिल्हा माहिती कार्यालय, धुळे

000000