मुंबई, दि. 11 : यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी इच्छुक गणेश मंडळांनी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत प्रवेशिका सादर कराव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री यांचे, तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती, सण, उत्सव आपली भाषा, परंपरा जगभरात पोहोचावी. तसेच आपले सण – उत्सव साजरे करताना पर्यावरणपूरक संकल्पनेचा अवलंब व्हावा, यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, ध्वनी प्रदूषणविरहीत वातावरण, समाज प्रबोधनात्मक देखावे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सजावट, मंडळामार्फत करण्यात येणारे सामाजिक कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, गणेश भक्तांना पुरविण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधा आदी निकषानुसार या स्पर्धेत सहभागी गणेशमंडळांना गुण देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्याची प्रक्रिया आणि निकष आदींबाबत माहिती प्रधान सचिव श्री. खारगे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून देत जास्तीत जास्त मंडळांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
माहिती व जनसंपर्क महसंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि.12 आणि बुधवार दि.13 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, दि. 12 सप्टेंबर, 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
०००