शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका, राज्य शासन तुमच्या पाठीशी – पालकमंत्री संजय राठोड

0
6

यवतमाळ,दि.14 सप्टेंबर (जिमाका) : राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी आत्महत्या करु नये. शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी आझाद मैदान येथे आयोजित बैलपोळा उत्सवात केले.

नगरपरिषदच्यावतीने आयोजित बैलपोळा उत्सव समारंभात पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते उत्कृष्ट बैलजोडीधारकांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आझाद मैदान येथे दरवर्षी प्रमाणे पारंपरिक बैलपोळा उत्सव भरविण्यात येतो.

यंदाच्या वर्षी या उत्सवात 38 बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. यातील परिक्षण मंडळाने निवडलेल्या पाच सर्वोत्कृष्ट बैलजोडी धारकांना बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. यात प्रथम क्रमांक सरदार चौधरी, द्वितीय क्रमांक शंकर कासार, तृतीय क्रमांक दिनेश तिवाडे, चौथा क्रमांक दिपक सुलभेवार आणि पाचवा क्रमांक भोला देवकर यांनी पटकावला. या विजेत्यांना पालकमंत्री श्री. राठोड यांच्याहस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या वेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, राजेंद्र डांगे, माजी सभापती गजानन इंगोले, रमेश अग्रवाल आणि शेतकरी व स्पर्धक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री संजय राठोड संबोधित करतांना म्हणाले, पोळा सण भावी पिढीला समजला पाहिजे. सणाविषयी त्यांना शिकवण देणे गरजेचे आहे. आगामी काळात सण उत्सव उत्साहाने साजरा करण्याचा प्रयत्न होईल, यासाठी नियोजन करण्यात येईल. राज्य शासनाने शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून  त्यांचे आत्मबल व मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न राज्य शासनाने केला आहे. शेतकऱ्यांना मोफत अन्नधान्य, सन्मान निधी यासारख्या विविध योजनांतून लाभ दिला. नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिर्घकालीन व अल्पकालीन उपाययोजना राज्य सरकार करत आहे. शेतकऱ्यांना चांगले बियाणे, 24 तास वीजपूरवठा, पाणी आदी सूविधा देवून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम राज्य शासन करणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये. शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here