आयुष्यमान भव: योजनेत कागल राज्यात अग्रेसर ठरेल – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : आयुष्यमान भव: योजनेत कागल, गडहिंग्लज, उत्तूर या भागाचे काम राज्यात अग्रेसर ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

कागलमध्ये आयुष्यमान भव: योजनेचा प्रारंभ मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात आयुष्मान भारत योजनेच्या ओळखपत्रांचे प्रातिनिधिक स्वरुपात नागरिकांना वितरण झाले. टी.बी. निक्षयमित्र म्हणून क्षयरोग झालेल्या रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषणयुक्त मासिक आहाराचे पॅकेज देणाऱ्या डॉ. मंगल ऐनापुरे व पेठवडगाव येथील राहोबत सेवाभावी संस्था यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते झाला.

श्री. मुश्रीफ म्हणाले, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम कागल, गडहिंग्लज व उत्तुर मध्ये महाराष्ट्रात उच्चांकी झाले आहे. उर्वरित नागरिकांनाही या दोन्ही योजनेची ओळखपत्रे काढून द्या. वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. आपली जबाबदारी मानून गोरगरिबांची सेवा प्रामाणिकपणे करा, असेही त्यांनी सांगितले.

श्री. मुश्रीफ म्हणाले, आयुष्मान भव: योजनेअंतर्गत आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान भारत योजना कार्डची नोंदणी व वितरण, स्वच्छता अभियान, आयुष्मान सभा, रक्तदान मोहीम, अवयव दान जनजागृती मोहीम, १८ वर्षावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी आदी उपक्रम विशेष मोहीम म्हणून प्रभावीपणे  राबवा.

व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष नवल बोते, आरोग्य सेवा संचालक डॉ. प्रेमानंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम पवार, डॉ. उमेश डॉ. सावंत, डॉ. बामणीकर, डॉ. गांधी आदी उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक आरोग्यसेवा संचालक डॉ  प्रेमानंद कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नासिर नाईक यांनी केले. आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी मानले.