बीड जिल्ह्याच्या विकासकामांसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यानंतर भरघोस निधी

0
8

छत्रपती संभाजीनगर दि. 16 : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी आयोजनाच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत बीड जिल्ह्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याने हा निधी प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यात प्रथमच सोयाबीन संशोधन व प्रक्रिया केंद्र उभारले जाणार असून त्याचबरोबर माजलगाव उजव्या कालव्यात जायकवाडीचे पाणी आणण्याचे अनेक वर्षांचे प्रयत्न देखील आता सफल झाल्याचे दिसत आहे.

“राज्य सरकारने मराठवाड्यासाठी आज सुमारे 59 हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज घोषित केले आहे. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. या सर्व निर्णयांचे स्वागत करून मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे जिल्हावासीयांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करतो,” असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

जायकवाडी टप्पा 2 अंतर्गत पैठण उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी आणणे व पुढे माजलगाव उजव्या कालव्यातून हे पाणी 148 किमी पर्यंत घेऊन जाणे, याद्वारे जिल्ह्यातील 84 हजार 850 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या कामासाठी 536 कोटी 61 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या सुधारित 286. 68 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता, तर बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी परळी, अंबाजोगाई, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, माजलगाव व बीड या 8 तालुक्यात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेतून 1600 मुलींसाठी वसतिगृहे व शाळा उभारण्यास मान्यता देऊन 80.05 कोटी रुपये निधी खर्चास मान्यता देण्यात आली. सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत अंबाजोगाई सह मराठवाड्यातील विविध मंदिरांच्या विकासासाठी एकूण 253.70 कोटी रुपये निधीस मान्यता देण्यात आली.  बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारत बांधकामासाठी 63.68 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.  सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बीड येथील प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास मान्यता देण्यात आली.  परळी वैद्यनाथ शहर बसस्थानाकाच्या नूतनीकरणाच्या 28 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली.

परळी वैद्यनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया केंद्र त्याचबरोबर शासकीय कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  पशु संवर्धन विभागामार्फत अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथे लाल कंधारी व देवणी व वंश जतन व संवर्धन करण्यासाठी पशु पैदास प्रक्षेत्र उभारण्यास मान्यता देण्यात आली.  परळी वैद्यनाथ मतदारसंघातील मलकवाडी (कांगणेवाडी), उजनी, खो.सावरगाव, गोवर्धन तांडा, कन्हेरवाडी, वाका, मांडवा (परळी), पाडोळी, सारडगाव या साठवण तलावांना मान्यता देण्यात आली.  परळी तालुक्यातील सिरसाळा एमआयडीसीला मान्यता देऊन, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक खर्च करून एमआयडीसी कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली.   मराठवाड्यातील कृषी विभागाच्या विविध विकास कामांसाठी 709 कोटी 49 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, अंतर्गत ठाणा ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर येथे शासन अनुदानित कृषी महाविद्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here