माहिती जनसंपर्क महासंचालनातर्फे आयोजित चित्रप्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व पुस्तकाचे प्रकाशन

0
9

छत्रपती संभाजीनगर, दि.17(जिमाका)- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज सिद्धार्थ उद्यानात मुख्य शासकीय समारंभस्थळी माहिती व जनसंपर्क महासंचालनातर्फे आयोजित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

सिद्धार्थ उद्यानात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मिना, मराठवाडा विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे, पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस आयुक्त मनोज लोहिया आदी उपस्थित होते. या प्रदर्शनास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधिर मुनगंटीवार तसेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रधान सचिव विकास खारगे यांनी भेट दिली.

या प्रदर्शनात मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाशी निगडीत महत्त्वाची छायाचित्रे व महत्त्वाच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले आहे. तसेच डॉ. मंगला बोरकर यांनी तयार केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या रेखाचित्रांची मांडणीही प्रदर्शनात करण्यात आली आहे.
जिल्हा माहिती कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांनी संपादित केलेल्या ‘मराठवाडामुक्ति संग्रामाची स्मृतिगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम,एक आकलन’ ही माहिती पुस्तिका, आणि स्मृतिदर्शिका 2023-24 चे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रदर्शनास नागरिक, विद्यार्थी विद्यार्थिनींनी , शासकीय अधिकारी- कर्मचारी यांनी भेट दिली.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here