नाशिक, दि. 17 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) :- शासनामार्फत विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुणांमधील कौशल्य विकसित करून रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त येवला, जि. नाशिक येथे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला यांच्यातर्फे पीएम स्कील रन तसेच सन २०२३ मधील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान समारंभ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाभूळगाव ता. येवला येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काम करत असलेल्या महायुती सरकार तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत अनेक योजना राबवीत आहे. भारतासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशाला भेडसावणाऱ्या प्रश्नापैकी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रोजगार निर्मिती. रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी देश पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. गरजेनुसार व बदलत्या आधुनिक गरजांनुसार विविध योजना नव्याने आणल्या जातात व त्यांची अंमलबजावणी करण्यात येते. याव्दारे रोजगार निर्मिती अथवा स्वयंरोजगार पुरवून रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून रोजगार प्राप्ती हा दृष्टीकोन समोर ठेवण्यात आला आहे. मेक इन इंडिया, स्किल इंडिया या संकल्पनेस अनुसरून कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवलेले आहे. राज्यातील युवक-युवतींचा प्रशिक्षणाद्वारे कौशल्य विकास करून रोजगार तसेच स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास अभियान राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने शनिवार दि.२३ सप्टेंबर रोजी एमईटी भुजबळ नॉलेज सिटी मध्ये भव्य रोजगार मेळावा आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो. कौशल्य आणि ज्ञान हे देशाच्या आर्थिक वाढीची आणि सामाजिक विकासाची प्रेरक शक्ती आहे. भारतासारख्या लोकसंख्येसह वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत एकीकडे उच्च प्रशिक्षित गुणवत्ता कुशल संसाधनांची कमतरता असून, दुसरीकडे लोकसंख्येचा एक मोठा वर्ग असा आहे की, ज्याच्याकडे थोडी किंवा अजिबातच नोकरीविषयक कौशल्ये नाहीत. शैक्षणिक पात्रतांसह, बदलत्या काळाचा सामना करण्यासाठी आणि कठीण तंत्रज्ञानाच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असलेल्या गतिशील आणि उद्योजक तरुणांना तयार करणे आवश्यक आहे.
कोणतेही विशिष्ट कार्य करण्यासाठी कौशल्य एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कौशल्य निर्माणाकडे उत्पादनाची परिणामकारकता आणि कामगारांचे त्यातील योगदान सुधारण्याचे एक साधन म्हणून पाहिले जाऊ शकते. कौशल्य निर्माण हे उत्पादन क्षमता व अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढविण्यासाठीचे ते एक महत्त्वपूर्ण घटक आहेत, असेही त्यांनी सांगितले.
भारत हा जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक असून भारताकडे जगभरातील विविध अर्थव्यवस्थांना कुशल मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता आहे. तसेच स्वतःच्या वाढीच्या क्षमतेमुळे स्वतःच्या गरजा पुरविण्याची क्षमता भारतात आहे. वाढती बाजारपेठ आणि कुशल मनुष्यबळाचे स्त्रोत असलेल्या भारतात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी आपल्या देशात कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. यासाठी शासनाच्या वतीने कौशल्य विकासास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कौशल्य विषयक शिक्षण घेणे काळजी गरज बनली असून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करण्याची आवश्यकता आहे, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी मंत्री भुजबळ यांच्या हस्ते रन फाॅर स्कील तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. राठोड यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद करून संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली.
कार्यक्रमास प्राचार्य वाय. के. कुलकर्णी, सदस्य सचिव आर. एस. राजपूत, यांच्यासह संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000