डेक्कन ओडिसी ट्रेन २.० पुन्हा नव्या रूपात धावण्यास सज्ज; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उद्या शुभारंभ

मुंबई, दि. २० : आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन २.० नव्या रुपात धावण्यास सज्ज झाली आहे. डेक्कन ओडिसी २.० या ट्रेनचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फलाट क्रमांक १८ येथे गुरूवार दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, भारतीय रेल्वेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. मान्यवरांना घेऊन ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे असा प्रवास करणार आहे.

देशातील प्रसिद्ध ४ शाही रेल्वेपैकी एक असणारी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन २.० ही नव्या रुपात पुन्हा पर्यटकांसाठी खुली होणार आहे. या ट्रेनमध्ये उच्च दर्जाच्या सोयीसुविधा देण्यात येतात. सन २००४ ते २०२० पर्यंत या आलिशान व आरामदायी ट्रेनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मात्र, सध्या डेक्कन ओडिसी ट्रेन अत्याधुनिक सोयीसुविधांनी पुन्हा पर्यटकांच्या सेवेकरिता सुरू होत आहे. या नूतनीकरण करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी सहलींमध्ये महाराष्ट्रा व्यतिरिक्त देशातल्या अन्य राज्यामधील पर्यटन स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ/