सारथीमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेकविध योजना राबविल्या जात आहेत. कौशल्य विकासाच्या योजनांच्या लाभामुळे मराठा समाजातील अनेक विद्यार्थी आत्मनिर्भर बनले असून शैक्षणिक योजनांमुळे गुणवत्तावाढीसाठी मदत झाली आहे. कौशल्य विकास व शैक्षणिक योजनांबाबत थोडक्यात माहिती…
कौशल्य विकास विभाग: सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम–(CSMS-DEEP)– या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सारथीच्या लक्षित गटातील ३० हजार उमेदवारांना नि:शुल्क प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. MKCL मार्फत उमेदवारांना ४ module अंतर्गत spoken English, soft skills, IT skills, accounting with Tally, Hardware and Networking, web designing, data management, digital freelancing, mobile app development कोर्सेस शिकवले जातात. लक्षित गटातील उमेदवारांसाठी सारथी मार्फत सदर प्रशिक्षण मोफत उपलब्ध करुन दिले जाते. या योजनेंतर्गत प्रति विद्यार्थी.२६ हजार ३६०/- रुपये खर्च येतो. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये २३ हजार ७१८ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. दिनांक १२ सप्टेंबर २०२३ अखेर सांगली जिल्ह्यांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांची संख्या ५७६ इतकी आहे.
श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम–इंडो–जर्मन टूल रूम (IGTR)- इंडो-जर्मन टूल रूम(IGTR), छत्रपती संभाजीनगर ही संस्था भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्यम मंत्रालय अंतर्गत काम करते. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद, पुणे, नागपूर व कोल्हापूर येथील प्रशिक्षण केंद्रांमधून एकूण 24 अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येते. ही संस्था पदव्युत्तर स्तर, पदव्युत्तर पदविका स्तर, पदविका स्तर आणि प्रमाणपत्र स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाच्या विस्तृत स्पेक्ट्रमच्या समावेश करण्यासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध करते. त्यामध्ये टूल डिझायनिंग, CAD/CAM, CNC मशिनिंग, LCA तसेच टेलर मेड मोड्युलस च्या विशिष्ट क्षेत्रातील अल्पकालीन अभ्यासक्रमांची संख्या ग्राहकांच्या गरजेनुसार डिझाईन आणि आयोजित केली जाते. सारथीच्या लक्षित गटातील ग्रामीण तरुणांचे कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने सारथीचा या संस्थेसोबत करार करण्यात आला आहे. सारथीमार्फत सदर प्रशिक्षण मोफत उपलब्ध करुन दिले जाते. सन 2022-23 मध्ये एकूण 424 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यांच्या प्रशिक्षणासाठी रुपये 71.73 लक्ष निधी खर्च करण्यात आलेला आहे. या योजनेचा सांगली जिल्ह्यातील 20 विद्यार्थ्यानी लाभ घेतला आहे यामुध्ये 4 मुलींचा समावेश आहे.
शिक्षण विभाग
छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृती योजना: –भारतातील सर्व राज्यांतील एक लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून NMMS शिष्यवृती अदा केली जाते. महाराष्ट्रासाठी एकूण 11 हजार 682 इतका कोटा मंजूर आहे. महाराष्ट्रातून लक्षित गटातील दरवर्षी 25 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी सदर परीक्षेमधून उत्तीर्ण होतात पण सर्वांनाच शिष्यवृतीचा लाभ मिळत नाही. म्हणून महाराष्ट्रातील NMMS परीक्षा उत्तीर्ण झालेले पण केंद्र सरकारची NMMS शिष्यवृती अप्राप्त असलेल्या लक्षित गटातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील 9 वी ते 12 वी पर्यंत नियमित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सारथीने ही योजना सुरु केली आहे. यामध्ये प्रती विद्यार्थी प्रती वर्ष 9 हजार 600 रुपये असे चार वर्षांसाठी 38 हजार 400 रुपये दिले जातात. सन 2021-22 या वर्षात 9 वी मधील 10 हजार 414 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 9 हजार 600 रुपये प्रमाणे 9 कोटी 99 लाख 74 हजार 400 रुपये इतकी शिष्यवृतीची रक्कम अदा केली आहे. सन 2022-23 या वर्षात इयत्ता 9 वी मधील 13 हजार 127 व इयत्ता 10 वी मधील 9 हजार 173 असे 22 हजार 300 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. 9 हजार 600 रुपये प्रमाणे 21 कोटी 40 लाख 80 हजार रुपये अदा करण्यात आलेले आहेत. यामध्ये सांगली 2 हजार 247 विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांना 2 कोटी 15 लाख 71 हजार रुपये देण्यात आले आहेत.
सारथी गुणवंत मुलामुलींना देशांतर्गत व परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृती
डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृती योजना:- सन 2022-23 मध्ये तीनशे विद्यार्थी निवडीसाठीची जाहिरात जुलै 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये 153 पात्र विद्यार्थ्यांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यास संबंधित विद्यापीठ/शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इ. शुल्क संबंधित विद्यापीठ /शैक्षणिक संस्थेमार्फत संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात जमा करण्यात येईल. जे विद्यार्थी वसतिगृहात जागेअभावी अन्यत्र राहात असतील अशा विद्यार्थ्यांना वसतीगृह शुल्क व भोजन शुल्काची रक्कम ही तो शिक्षण घेत असलेल्या संबंधित संस्थेच्या आकारणी करण्यात येत असलेल्या रकमेच्या मर्यादेत विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बॅंक खात्यात जमा करण्यात येईल. सारथी अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून 300 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. तसेच पुस्तकांसाठी एकूण 25 हजार व शैक्षणिक साहित्य व खर्च यासाठी 25 हजार लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 12 मुलांचा सहभाग आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड परदेश–सारथी गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षण शिष्यवृती योजना:– महाराष्ट्र राज्यातील अधिवास असलेले मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी–मराठा या सारथीच्या लक्षित गटातील मुलामुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी)चे विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत करणे. महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी–मराठा या जातीतील पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पी. एच. डी साठी अद्ययावत QS, World university ranking 200 च्या आतील परदेशी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना (पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका दोहोंसाठी 50 आणि पी. एच. डी साठी 25) ही शिष्यवृती मंजूर करण्यात येणार आहे.
छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धा: सन 2022-23 हे वर्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या वर्षात शाहू महाराजांच्या विविधांगी कार्याची ओळख महाराष्ट्रातील सर्वांना व्हावी यासाठी सारथी संस्थेने महराष्ट्रातील 358 तालुके व 29 महानगरपालिकेतील प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित विविध विषयांवर स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्राथमिक गटात 25 हजार 756 तर माध्यमिक गटात 35 हजार 779 असे एकूण 61 हजार 535 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभागी होऊन आपले निबंध सादर केले होते. प्रती तालुका 10 विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रशस्ती पत्रे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी 10 लाख 22 हजार 253 निधीची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील इयत्ता 3 री ते 5 वी मधील 367 व इयत्ता 6 वी ते 10 वी मधील 389 अशा 756 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.
विशेष उपक्रम: दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी सारथीच्या छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांद्वारे सारथीच्या सर्व योजनांच्या माहितीचे वाचन ग्राम सभेमध्ये करण्यासाठी व त्याद्वारे सारथीचा प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. उपक्रमांतर्गत एकूण 1 हजार 22 ग्रामपंचायतींमध्ये 1 हजार 193 विद्यार्थ्यांमार्फत एकाच वेळी योजनांचे वाचन करण्यात आले या उपक्रमामध्ये 51 हजार 535 ग्रामस्थांचा सहभाग होता. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींमध्ये सदर कार्यक्रम राबविण्यात आला असून त्यामध्ये सदर योजनेच्या 26 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये एकूण 815 ग्रामस्थांचा सहभाग होता.
सारथीच्या सर्व योजना तपशीलवार पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ- https://sarthi-maharashtragov.in. सारथी Application –SARTHI PUNE प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. युट्युबवर-SARTHI PUNE, फेसबुकवर –SARTHI PUNE, सारथी उपकेंद्र कोल्हापूर कार्यालय पत्ता: आर.एस. 376, राजाराम कॉलेज परिसर, प्रि. आय.ए.एस. प्रशिक्षण सेंटरच्या मागे, कोल्हापूर – 416 004. E- mail id- divkolhapursarthi@gmail.com, sarthikop21@gmail.com
- संकलन:- जिल्हा माहिती कार्यालय, सांगली
०००