इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या कामाला गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 21 :- आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आदिवासी बांधवांसह सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यात वासाळी येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची आदिवासी भागातील आमदारांची मागणी आहे. या मागणीचा विचार करून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक प्रेरणास्थान तसेच आजूबाजूचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावा. यासंदर्भातील कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस आमदार सुनील शेळके, चंद्रकांत नवघरे, माणिकराव कोकाटे, अपर मुख्य सचिव (वित्त) नितीन करीर, प्रधान सचिव नियोजन सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक बी.एन.पाटील यांच्यासह पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नाशिकचे  जिल्हाधिकारी आदी  मान्यवर दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची जागा इगतपुरी व कळसूबाई शिखर परिसराला लागून आहे. स्मारकापासून कळसूबाई शिखरापर्यंत रोप-वे च्या कामासाठी केंद्र सरकारकडून पर्वतमाला योजनेतून निधी मिळणे शक्य आहे. त्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

स्मारकाबरोबर आजूबाजूचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित केल्यास परिसरातील आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होवू शकतो.  यासाठी  आदिवासी विकास विभागाचा निधी वापरून या परिसराचा विकास करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सिद्धेश्वर धरण परिसराचे सुशोभीकरण व विकास वृंदावन बागेच्या धर्तीवर करण्यासाठी जलसंपदा विभाग प्रयत्न करीत आहे. यासाठी पर्यटन विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेऊन पुढील निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बैठकीत सांगितले.

0000