कांदा व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी पूर्ववत सुरू करावी – पालकमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

नाशिक, दिनांक 21 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापारी संघटनांनी कालपासून जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवरातील कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा व्यापारी व शेतकरी यांच्या प्रश्नांवर सकारात्मक दृष्टीकोनातून तोडगा काढण्यासाठी पणन मंत्री यांनी 26 सप्टेंबर 2023 रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने कांदा व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी पूर्ववत सुरू करण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा व्यापारी, शेतकरी यांच्या प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक फयाज मुलाणी, जिल्ह्यातील कृषी बाजार समित्यांचे प्रमुख, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, कांदा व्यापारी व शेतकरी यांचे जिल्हा पातळीवरील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य असून कांदा व्यापारांच्या बाबतीत सकारात्मक दृष्टीकोनातून त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्यात आल्या आहेत. 26 सप्टेंबर 2023 रोजी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या बैठकीस जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पणन मंडळाचे सहव्यवस्थापक आदी अधिकारी उपस्थित राहाणार आहेत. या बैठकीत कांदा व्यापारी व शेतकरी यांच्याशी चर्चा करून कांदाप्रश्नाबाबत योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित कांदा व्यापारी, संघटना आणि शेतकरी प्रतिनिधी यांना अश्वासित केले.

पालकमंत्री भुसे पुढे म्हणाले, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होते त्याचप्रमाणे नाफेड व सहकारी संस्थामार्फत कांद्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. एन सी सी एफ व नाफेड यांचे कार्य बाजारात स्थिरता ठेवण्याचे आहे. जिल्ह्यातील बाजार समितीतील अनुज्ञप्तीधारक व्यापारी व आडते यांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकरी वर्गास त्यांचा शेतीमाल विक्री करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी दूर होण्यासाठी त्याचसोबत गणोशोत्सव व आगामी येणाऱ्या सणांचा विचार करून व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी सुरू करण्याचे आवाहन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केले. यास प्रतिसाद म्हणून उपस्थित व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी त्वरीत जिल्ह्यातील बाजार समितीमधील व्यापाऱ्यांची  बैठक घेवून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे बैठकीत सांगितले. यावेळी नाफेड कडून खरेदी झालेला कांदा व निर्यात झालेला कांदा यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही  पालकमंत्री दादाजी भुसे यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

000