‘सारथी’ मुळे मिळतेयं मराठा समाजाच्या तरूणांच्या स्वप्नांना बळ!

राज्यातील सर्व घटकांच्या विकासाला पूरक वातावरण, सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील असते. याच उद्देशाने महाराष्ट्रातील विविध जातसमूहांच्या अस्तित्वाची दखल घेऊन त्या अनुषंगिक सहाय्यक योजना, उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने विविध महामंडळांची, विभागांची निर्मिती राज्य शासन करत असते. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या, युवा पिढीच्या प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे सारथीची स्थापना करण्यात आली आहे. सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी विविध कल्याणकारी उपक्रम, योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत. आतापर्यंत राज्यातील १ लाख ३३ हजार २३६ विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे.

संरचना आणि निधीची तरतूद

राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत स्वायत संस्था म्हणून छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात सारथी कार्यरत आहे. शासनाकडून या संस्थेस भरीव निधी प्राप्त होत असून सन २०२३-२४ या  वर्षात ३०० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे असून उपकेंद्र कोल्हापूर येथे कार्यरत आहे. त्यासोबतच राज्यात सारथीची ८ विभागीय कार्यालये कोल्हापूर, खारघर नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत. ही संस्था राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली Indian Companies Act 2013 & Rules कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अन्वये नोंदणीकृत असून संस्थेमार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांची कालबद्ध तऱ्हेने व प्रभावीपणे अंमलबाजावणी करण्यात येते. सारथीच्या संचालक मंडळावर शासनाने बारा संचालकांची नियुक्ती केलेली आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून संस्थेचे कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येते. सारथी संस्थेचे संस्थापन समयलेख Memorandum of Association & Article of Association (MoA व AoA) हे Registrar of Companies यांचेकडे चार जून 2018 रोजी नोंदणीकृत केले असून त्यामध्ये नमूद तीन मुख्य उद्दिष्टे व 82 पूरक उद्दिष्टानुसार संस्थेचे कामकाज चालू आहे.

सारथीमार्फत राबविण्यात येत असलेल्या शैक्षणिक प्रगतीच्या योजना

उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती

डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती सन 2022-23 मध्ये तीनशे विद्यार्थी निवडीसाठीची जाहीरात जूलै 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून यामधील 153 पात्र विद्याथ्यांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुलामुलींना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना या वर्षापासून सुरु करण्यात येत असून चार जुलै 2023 रोजी मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासाठीची जाहिरात ऑगस्ट 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून 75 अर्ज प्राप्त झाले आहेत.

छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF)

या अतंर्गत सारथी मार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे / विकसित करणे. संशोधन पुर्ण होईपर्यंत परंतू कमाल पाच वर्षाच्या कालावधी करिता संशोधन प्रगती अहवालाच्या आधारे प्रतिमाह रु. 31,000/- अधिछात्रवृत्ती देण्यात येते. यामध्ये 2019 ते 2023 या कालावधीत एकुण 2109 विद्यार्थांचा सहभाग आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम (csms-deep) राबवण्यात येतो. दि.1 फेब्रुवारी 2023 पासून प्रशिक्षणास सुरवात करण्यात आली असून यामध्ये ऑनलाईन प्राप्त झालेल्या एकूण 36,525 अर्जांपैकी अंतिम छाननीतून सारथी संस्थेने मान्यता दिलेल्या अर्जाची संख्या 27,346 इतकी आहे.

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती 2022-23 योजना 

यामध्ये एकूण 31.23 कोटी रु. वाटप करण्यात आले आहे. यासाठी इयत्ता 9 वी व 11 वी मध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण, 10 वी मध्ये 60% गुण मिळणे आवश्यक आहे. सारथी संस्थेने वरील अटीसह उत्तीर्ण झालेल्या व केंद्राच्या कोट्यामुळे शिष्यवृत्ती अप्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रु. 800 प्रमाणे वार्षिक रू. 9600/- प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.. तर मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृत्ती (CMSRF)- सारथी मार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी ही योजना राबवण्यात येते.

शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

सन 2022-23 पासून ही योजना सारथीतर्फे राबवण्यात येते. यामध्ये वार्षिक लाभार्थी संख्या 2500 इतकी असून फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, कापणीनंतरचे प्रशिक्षण, यामध्ये सामान्य हरितगृह व्यवस्थापन, शेड नेट हाऊस व्यवस्थापन, वनस्पती प्रसार आणि भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याबाबत पाच दिवसाचे प्रशिक्षण दिल्या जाते. शेतकरी उत्पादन कंपनी प्रशिक्षण कार्यक्रम 2023-24 योजनेचा कार्यारंभ आदेश जानेवारी 2023 रोजी देण्यात आला आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्याचे कामकाज एमसीडीसी स्तरावर सुरु असून ऑक्टोबर 2023 पासून प्रशिक्षणाचे राज्यातील 26 ठिकाणी सुरवात करण्यात येईल. याचे वार्षिक लाभार्थी एक हजार असणार आहेत.

सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

या कार्यक्रमांतर्गत 35 सेक्टरचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राजमाता जिजाऊ कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे प्रयोजन आहे. सदर संस्थेमार्फत वीस हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु करण्याच्या अनुषंगाने डिसेंबर 2022 रोजी सामंजस्य करार करुन कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची माहिती देण्यासाठी सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) यांना सूचित करण्यात आले आहे. विद्यार्थी नोंदणी सुरु असून 186 अर्ज प्राप्त झाले आहेत.

छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धाचे आयोजन

छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील सर्व तालुक्यामध्ये प्राथमिक व माध्यमि गटातील विद्यार्थ्यांसाठी निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध वयोगटातील एकूण 61 हजार 535 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर 5290 विद्यार्थ्यांना 10.25 लक्ष रुपयांची पारितोषिके देण्यात आली आहेत. तसेच करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिरांचे ही राज्यभरात विविध जिल्ह्यांत आयोजन केल्या जाते. ज्याचा विद्यार्थाना मोठ्या प्रमाणात लाभ मिळतो.

विभागाकडून राबविण्यात येणारे विविध प्रकल्प / योजना

या सोबतच कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये सारथी मार्फत श्रीमंत मालोजीराजे सारथी इंडो जर्मन टुल रूम प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर व नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रांमधून डिसेंबर 2022 व 6 फेब्रुवारी 2023 पासून 466 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. यापैकी 166 मुलांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून नोकरीसाठी त्यांच्या मुलाखती सुरु आहे. तसेच नवीन जाहीरात ही 3 जूलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्यावत, आधुनिक कौशल्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून उद्योगांना आवश्यक रेडी टू वर्क मनुष्यबळ उपलब्ध करणे हे उद्देश आहेत. यामध्ये 24 वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच इंडो जर्मन टूल रूम प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी संस्थेमार्फत अदा करण्यात येते.

याप्रमाणे सारथी मार्फत विविध योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबतच समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी, आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे.

  • संकलन, जिल्हा माहिती कार्यालय,नाशिक