चिंतामणीनगर रेल्वे उड्डाण पुलाचे काम जलद गतीने करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

 सांगली, दि. २३ (जिमाका) :  वाहतुकीची होणारी कोंडी आणि लोकहिताचा विचार करून चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सुरू करून हे काम जलद गतीने पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. या परिसरातील नागरिकांना वाहतुकीची सोय व्हावी यासाठी रेल्वे उड्डाण पुलाखाली पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी रेल्वे व संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

सांगली – तासगाव रोडवरील चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपूल बांधकाम अनुषंगाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील पालकमंत्री कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनील पवार, मध्य रेल्वेच्या दक्षिण झोनचे मुख्य अभियंता सुरेश पाखरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले की, चिंतामणीनगर व परिसरातील लोकांना रहदारीची सोय व्हावी यासाठी रेल्वे पुलाखाली करण्यात येणाऱ्या पर्यायी रस्त्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने रेल्वे विभागास पत्र द्यावे. रेल्वेनेही यासाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक यंत्रणेस उपलब्ध करून द्यावे. यासाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक प्राप्त झाल्यानंतर निधी उपलब्ध करून देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल.

तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगली-तासगाव रोडवरील चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपूल बांधकाम परिसराची पाहणी केली.

उड्डाणपूल, परिसरातील नागरिकांसाठी पर्यायी मार्गाबाबत अधिकारी व नगरिकांशी चर्चा केली व या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल असे नागरिकांना आश्वासित केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनील पवार, मध्य रेल्वेच्या दक्षिण झोनचे मुख्य अभियंता सुरेश पाखरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रंतीकुमार. मिरजकर, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे, रेल्वेचे अधिकारी शंभो चौधरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

०००