जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून कर्नाटकातील हेबल नाल्याची पाहणी

सोलापूर, दि.२३ (जिमाका): यावर्षी पाऊस कमी झाल्याने व सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर येथील पाणीसाठा काही दिवस पुरेल एवढाच असल्याने कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा व्हावा, याबाबत दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समिती सदस्यांनी पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली होती.

त्या अनुषंगाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाने त्वरित प्रस्ताव सादर करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यात सोलापूर शहराला अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याबाबत चर्चा होईल. तत्पूर्वी जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अलमट्टी धरणातून सोलापूर शहराला कशा पद्धतीने पाणीपुरवठा करता येईल याबाबत पाहणी करावी असे सूचित केले होते.

त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे व कर्नाटकच्या इंडी ब्रांच कॅनॉलचे उपअभियंता हिरोळे यांच्या समवेत औज नदीपासून १२ किलोमीटर असलेल्या कर्नाटकमधील हेबल नाल्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विजयपूरच्या जिल्हाधिकारी यांच्या समवेत काल फोनद्वारे चर्चा केली होती. पाहणीसाठी विजयपूर जलसंपदा विभागाचे अधिकारी त्यांनी पाठवून दिलेले होते.

कर्नाटकमधील अलमट्टी धरणाच्या इंडी  कॅनॉलची नाल्याची लांबी 160 किलोमीटर आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या औज नदीपासून बारा किलोमीटर अंतरावर कर्नाटक मधील हेबल नाल्यापर्यंत अलमट्टी धरणाचे पाणी येते. या नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता 50 क्युसेक पर्यंत आहे. परंतु पूर्ण क्षमतेने या नाल्यातून पाणी सोडल्यास ते नाल्याच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊ शकते. त्यामुळे किमान 25 ते 30 क्यूसेक पाणी औज पर्यंत येऊ शकते, अशी माहिती इंडी ब्रांच कॅनॉलचे उपअभियंता हिरोळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिली.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण हेबल नाल्याची पाहणी केली. तसेच हेबल नाल्यामध्ये काही ठिकाणी झाडेझुडपे व वृक्ष मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, सोलापूर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, उप अभियंता कोकरे, सेवानिवृत्त अभियंता पी. एस. केसकर, विजयपूर संपदा विभागाचे उपअभियंता शिरोळे कनिष्ठ अभियंता काटे उपस्थित होते.

अलमट्टी धरणातून सोलापूर शहराला पाणी सोडण्याच्या अनुषंगाने आज झालेली संयुक्त पाहणी ही प्राथमिक आहे. सद्यस्थितीत आजच्या पाहणीच्या अनुषंगाने राज्य शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. तो अहवाल सादर झाल्यानंतर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये या अनुषंगाने चर्चा होऊन निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे.

०००