नाशिक,दिनांक: 24 सप्टेबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : ज्येष्ठ नागरिक होणे हा मानवी आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा आहे. जीवनात उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व एकमेकांशी सुसंवाद या त्रिसूत्रीचा अंगिकार केल्यास आपण आनंदी आयुष्य जगू शकतो. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आज येवला येथे श्री. स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ सभामंडप लोकार्पण प्रसंगी मंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अभिजीत शेलार, कनिष्ठ अभियंता अमोल शिंदे यांच्यासह श्री. स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, वयाची साठी ओलांडल्यानंतर मनुष्यास ज्येष्ठत्व येते. वयाच्या या वळणावर प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आयुष्यात योग्य बदल करून घेतले पाहिजेत. उत्तम आरोग्य हिच आपली संपत्ती आहे. यासाठी नियमित फिरणे, व्यायाम करणे, योगा करणे आणि आहारात आवश्यक बदल करणे हे तितकेच महत्वाचे आहे. चांगले ग्रंथ, पुस्तके, वर्तमानपत्र वाचन करणे, वयानुरूप खेळ खेळणे, मनोरंजनात्मक छंद जोपासणे हे गरजेचे असून यातून जगण्याची नवी दिशा मिळते. श्री. स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्य येथे एकत्र येतात, एकमेकांशी सुसंवाद साधतात यातून सुख-दु:ख, एकमेकांचे विचार यांची देवाणघेवाण होते. यामुळे मन मोकळे होवून प्रफुल्लीत रहाते.
मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून एक कुटुंब निर्माण झाले आहे. येथे जात-पात, धर्म या गोष्टींना महत्व नसून सर्व स्त्री-पुरूष ज्येष्ठ नागरिक कुटुंबातील सदस्यांप्रमाणे एकत्र येवून वेगवेगळे उपक्रम राबवितात. त्यातून त्यांना जगण्याची नवी उर्जा मिळते आणि आपलेपणाच्या नात्यातील दृढता वाढते. असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्री. स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघास मंत्री छगन भुजबळ यांनी रूपये
२५ हजारांची देणगी जाहिर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक भोलानाथ लोणारी यांनी केले.
000