उपमुख्यमंत्र्यांकडून ‘अमृतकलश’ यात्रेचे स्वागत; गणेशोत्सव मंडळांवर ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाचा ठसा

0
4

नागपूर दि. 25 : ‘मेरी माटी मेरा देश ‘ उपक्रमातंर्गत सध्या अमृतकलश अभियान सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अमृत कलशाला काल माती आणि तांदूळ समर्पित केले. हे अभियान संपूर्ण शहरात सक्रियतेने राबविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

देशातील शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी, मातृभूमीचे वंदन करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव देशभर सुरु आहे. यामध्ये ‘मेरी माटी, मेरा देश ‘ अभियानाला नागपूर शहरात नागपूर महानगरपालिका तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे.

लोकप्रतिनिधींना सहभागी करणे हे देखील या उत्सवातील एक उपक्रम असून नागपूर शहरातील लोकप्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये सहभागी झाले. स्थानिक स्तरांवर विविध नगरातून निघालेल्या कलश यात्रेचे त्यांनी स्वागत केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देवून श्री. गणरायाचे दर्शन घेतले व नागरिकांच्या सुख-समृद्धीची कामना करत राज्यावरील विघ्न दूर करण्याची प्रार्थना केली. याप्रसंगी गणेशोत्सव मंडळांकडून उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत ‘अमृत कलशाने’ करण्यात आले. उपमुख्यमंत्री यांनी देखील या अमृत कलशात माती व तांदुळ समर्पित करत गणेशोत्सव मंडळाचा उत्साह वाढविला.

देशातील शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ ही मोहीम सुरू करण्यात आली असून याअंतर्गत देशभरात ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येत आहे.  देशाच्या कानाकोपऱ्यातून 7500 कलशांमध्ये माती घेऊन ही यात्रा देशाची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे. या कलशांमधील जमा मातीत राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ ‘अमृत वाटिका’ बांधण्यात येणार आहे. यासाठी गावागावातून अमृत कलशामध्ये माती व तांदूळ गोळा करण्यात येत आहेत. देशभक्तीच्या या उपक्रमात नागपूरच्या गणेशोत्सव मंडळांनी नोंदविलेल्या सहभागाबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here