‘स्वच्छता पंधरवडा’ निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात श्रमदान; ‘कचरामुक्त भारत’चे स्वप्न साकार करुया !                             

0
11

अमरावती, दि.27 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान ‘स्वच्छता ही सेवाउपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियांतर्गत ‘कचरामुक्त भारतबाबत विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येणार आहे. विभागातील सर्व नागरिकांनी या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत ‘कचरामुक्त भारत’चे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून आपल्या गावाची व परिसराची स्वच्छता करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे केले. याप्रसंगी विभागीय आयुक्तांनी स्वत:च्या दालनाची व परिसराची स्वत: स्वच्छता करीत स्वच्‍छतेचे महत्त्व पटवून दिले.

स्वच्छता पंधरवडा निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी (ता.26 सप्टेंबर) श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. मनपा आयुक्त देविदास पवार, उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, नगरपालिका प्रशासनाच्या सह आयुक्त माधुरी मडावी, सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, तहसीलदार वैशाली पाथरे, संतोष काकडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांच्याव्दारे विभागीय आयुक्त कार्यालयातील विभाग तसेच परिसराची प्रत्यक्षरित्या साफ-सफाई व स्वच्छता करण्यात आली.

 ‘स्वच्छता ही सेवा २०२३’ची थीम ‘कचरामुक्त भारत’ही आहे. यामध्ये दृश्‍यमान स्वच्छता व सफाईमित्र कल्याण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील बसस्थानक, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे, नदी किनारे, सार्वजनिक ठिकाण येथे श्रमदानातून स्वच्छता करावयाची आहे. तसेच सार्वजनिक शौचालय, कचराकुंड्या, कचरा वाहतूक वाहन आदी सर्व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून दुरुस्ती, रंगकाम, साफसफाई करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जनतेनी आपल्या गावात, शहरात, परिसरात स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच स्वच्छता पंधरवडा व स्वच्छता मोहिमेची व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.

प्रारंभी, राष्ट्रपिता महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ‘स्वच्छता पंधरवडा’ आयोजनाच्या उद्देशाबाबत श्रीमती मडावी यांनी माहिती दिली. ‘मी स्वच्छतेसाठी दरवर्षी शंभर तास तसेच दर आठवड्याला दोन तास देईल’ अशी स्वच्छतेची शपथ श्रीमत मडावी यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना यावेळी दिली. याप्रसंगी शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

अभियानांतर्गत गावांत आयोजिले जाणारे महत्त्वाचे उपक्रम

  • गावांमधील कचरा साचलेल्या ठिकाणांची स्वच्छता
  • कचरा संकलन आणि विलगीकरण शेड/केंद्रांचे बांधकाम
  • पाणवठ्यांजवळील परिसर स्वच्छ ठेवणे आणि त्यांच्या आजूबाजूला वृक्षारोपण करणे
  • कचऱ्याच्या उगमस्थानी कचरा विलगीकरण (सुका आणि ओला) याबाबत सामुदायिक जागरुकता
  • जीईएमद्वारे ट्रायसायकल/ई-कार्ट (बॅटरीवर चालणारे वाहन) यासारखे कचरा संकलन वाहन खरेदी करणे
  • प्लास्टिक सारखा अ-विघटनशील कचरा दारोदारी जाऊन गोळा करणे
  • एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या (एसयुपी) दुष्परिणामांबद्दल ग्रामसभा आयोजित करून आणि एसयुपी वर बंदीचे ठराव पारित करून जनजागृती करणे
  • प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनासाठी 4R तत्त्वांचा प्रचार करणे- नकार देणे, कमी करणे, पुन्हा वापरणे आणि पुनर्निर्मिती करणे
  • ओडीएफ प्लस बाबत सरपंच संवाद आयोजित करणे
  • भित्ती चित्र, नुक्कड नाटक, स्वच्छता रथ, समाज माध्यम साहित्य, ग्राम सभा अशा व्यापक कार्यक्रमांच्या माध्यमातून आयपीसी द्वारे जनजागृती करण्यासाठी व्यापक आयईसी आणि मास मिडिया मोहीम राबवणे
  • घोषवाक्य लेखन / “कचरा न टाकण्याची” प्रतिज्ञा घेणे
  • एसएचएस पोर्टलवर एसएचएस उपक्रमांच्या दैनंदिन प्रगतीची अद्ययावत माहिती देणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here