पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत गणपती विसर्जन; रथ मिरवणूकीला झाली जल्लोषात सुरूवात

नाशिक, दिनांक 28 सप्टेंबर, 2023(जिमाका वृत्तसेवा): शहरातील भद्रकाली येथील वाकडी बारव येथून गणपती विसर्जन रथ मिरवणूक  पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल, ताशांच्या निनादात व टाळ मृदृंगाच्या गजरात उत्साहात सुरूवात झाली. मिरवणूकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाच्या गणपतीसह शहरातील विविध गणपती मंडळांनी सहभाग नोंदविला.

यावेळी आमदार प्रा.देवयानी फरांदे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर,नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आवेश पलोड, यांच्यास‍ह शहरातील विसर्जन मिरवणूकीसाठी सहभागी गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत मिरवणूक लवकरात लवकर पुढे नेऊन निर्विघ्नपणे पार पाडावी, असे आवाहन यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी गणेश मंडळांना केले.

स्वत: ढोल वाजवत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केला मिरवणूकीस प्रारंभ सुरवातीला महापालिकेच्या शासकीय मानाच्या गणपतीची मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर थेट मिरवणूकीत सहभागी होवून पालकमंत्री दादाजी भुसे यांनी स्वत: ढोल वाजवून मिरवणूकीस प्रारंभ केला. ‘गणपती बाप्पा मोरया,मंगलमुर्ती मोरया’ असा जयघोष करत गणपती विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या गणेशमंडळांना आणि भाविकांना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेचकायदा व सुव्यवस्थेचे पालन करून मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री.भुसे यांनी उपस्थितांना केले.

000