नाशिक, दि. १ – स्वच्छता अभियान ही प्रत्येकाची जबाबदारी असून यात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग महत्त्वाचा आहे. ‘आशेवाडी’ हे गाव स्वच्छतेचा आदर्शवत अग्रदूत असून या गावातील स्वच्छतेचे अनुकरण इतर गावांनीही करावे. असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
आज दिंडोरी तालुक्यातील रामशेज किल्ला, आशेवाडी येथे आयोजित ‘स्वच्छता हिच सेवा’ कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक पाटील, दिंडोरीचे तहसिलदार पंकज पवार, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, बाल विकास प्रकल्प अधिकारी विलास कवळे, आशेवाडीचे सरपंच साहेबराव माळेकर, उपसरपंच सौ. लताबाई कापसे, माजी जि.प सदस्या मनिषा बोडके, दिंडोरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक शाम बोडके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध गावचे लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, आशेवाडी प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यावेळी म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आज स्वच्छता हिच सेवा अभियान देशभरात राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक तास स्वच्छतेसाठी या जिल्हास्तरीय उपक्रमाची सुरवात आज रामशेज किल्ला आशेवाडी येथून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसमवेत करण्यात आली. आरोग्यदायी जीवन आणि गावाचा विकास साधायचा असेल तर त्याचे मूळ स्वच्छता आहे. आपल्या घरासोबतच आपला परिसर व आपले गाव स्वच्छ राहिल यादृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येवून इतरांनाही प्रेरणा मिळेल असे काम केले पाहिजे. आपली संस्कृतीही आपल्याला स्वच्छतेची शिकवण देते. आज आशेवाडी गावातील स्वच्छता हि कौतुकास्पद आहे परंतु गावकऱ्यांनी भविष्यातही हे सातत्य सदैव ठेवणे गरजेचे आहे. यासाठी गावातून स्वच्छतेसाठी फेरीचे आयोजन करून जनजागृती झाली पाहिजे. आशेवाडी गावाला रामशेज किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा आहे.
हा वारसा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने वनविभागाशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न केला जाईल. परंतु यात सर्वांचा सहभाग व प्रयत्न आवश्यक आहे. असेही राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.
राज्यमंत्री डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या, स्वच्छतेचा अर्थ केवळ परिसर स्वच्छता हा नाही तर यात आपण आपले चांगले विचार, उत्तम आरोग्य, आपली दिनचर्येतील सूसुत्रता आणने हे अभिप्रेत आहे. कार्यालयात काम करतांनाही आपण योग्य नियोजन केले तर कामे अपूर्ण न राहता वेळेत पूर्ण होतील. उत्तम आरोग्य ही दिर्घ आयुष्याची गुरूकिल्ली असून प्रत्येकाने आपल्या दिनचर्येत योगाभ्यास व व्यायाम यांचा समावेश करणे गरजेचे आहे. असेही राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगून आशेवाडीच्या गावकऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
आशेवाडी मनात रमणार गाव
आशेवाडी गाव निसर्गरम्य असून मनात रमणार गाव आहे. अशा शब्दात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आशेवाडी गावाचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, आज स्वच्छता हीच सेवा या अभियानाची सुरवात रामशेज किल्ला आशेवाडी येथून झाली. या गावाला प्रथमच भेट दिली असून येथील ऐतिहासिक वारसा व निसर्गरम्य वातावरण मनाला भावून गेले. प्रत्येक घरात स्वच्छता ठेवली तर निश्चितच गावही स्वच्छ होईल यात शंका नाही परंतु गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाटही योग्य पद्धतीने लावणे तितकेच गरजेचे आहे. गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनस्तवर प्रयत्न केले जातील असे बोलून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गावकऱ्यांना अश्वासित केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व संत गाडेगाबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आशेवाडी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनींनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक पाटील यांनी केले. यावेळी माजी जिप सदस्या मनिषा बोडके, सरपंच साहेबराव माळेकर यांनी गावक-यांच्यावतीने मनोगत व्यक्त केले.
स्वच्छता हिच सेवा अभियानाचा प्रारंभ राजशेज किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून करण्यात आली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी स्वच्छता करण्यात आली या मोहिमेत शासकीय अधिकारी, आशेवाडी प्राथमिक विद्यालयातील विद्याथी तसेच गावकरी यांनी सहभाग घेतला. यावेळी ‘स्वच्छ भारत निरोगी भारत’, ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’अशा घोषणाही देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुभाष पाटील सर यांनी तर उपस्थितांचे आभार बाल विकास प्रकल्प अधिकारी विलास कवळे यांनी मानले.