मुंबई, दि. १ – ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाअंतर्गत आज राज्यात ‘एक तारीख, एक तास’ स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यानुसार सकाळी १० ते ११ या कालावधीत राज्यातील सर्व ४११ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण १४५२२ ठिकाणी नागरिकांच्या सहभागाने श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. यात मान्यवरांसह १६ लाख ४ हजार ९९५ नागरिकांनी सहभाग घेत सुमारे १९४२ टन कचरा जमा करण्यात आला असल्याची माहिती नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या पंधरवड्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज एक तास विशेष मोहीम राबविण्यात आली. यात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.गोविंदराज आदींनी गिरगाव चौपाटी येथे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांनी शिवडी किल्ला येथे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे त्याचप्रमाणे केंद्रीय तसेच राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह कलावंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध ठिकाणी या अभियानात सहभाग घेऊन परिसर स्वच्छता केली.
या अभियानात मान्यवरांसोबत विविध सामाजिक संस्था, इंडियन मेडीकल असोशिएशन, क्रेडाई, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, आरबीआय, एसबीआय, आयसीआयसीआय, बॅंक ऑफ इंडिया या बॅंका, इंडियन टुरिझम, लायन्स क्लब, रोटरी क्लब, माउली फाउंडेशन, शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन, बचत गटांचे सदस्य आदींनीही उत्फुर्त सहभाग घेऊन स्वच्छता केली.
‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाअंतर्गत नागरीकांच्या सहभागाने जास्त कचरा असलेले क्षेत्र, रेल्वे लाईन, बस स्थानके, राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गाच्या शेजारील जागा, नदीघाट, जलस्त्रोत, झोपडपट्ट्या, पुलाखालच्या जागा, बाजारपेठा, गल्ल्या, धार्मिक स्थळे, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांचे परिसर, पर्यटन स्थळे, टोलनाके, प्राणी संग्रहालय, गो-शाळा, डोंगर, समुद्र किनारे, बंदरे, आरोग्य संस्थाचा परिसर, अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय परिसर, इत्यादी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
जनतेच्या सहभागातून प्रत्यक्ष स्वच्छता करणे व स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभारणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. एकाच वेळी स्वच्छता अभियान राबवून सर्व नागरिकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली दिली आहे. या उपक्रमासाठी आवश्यक साहित्य (झाडू, कचरा पेट्या, थैल्या इत्यादी) सबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत पुरविण्यात आले. स्वच्छता उपक्रमादरम्यान गोळा केलेल्या कचऱ्याची नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत कचरा प्रक्रिया केंद्रावर योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली.