उपलब्ध पाणीसाठ्याचे सुत्रबद्ध नियोजन करावे : पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक: 9 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा):

जिल्ह्यात या वर्षात पर्जन्यमान कमी झाले आहे. आजमितीस धरण समूहातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देवून आगामी ऑगस्ट 2024 पर्यंत पाणी पुरेल याकरिता सुत्रबद्ध नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे दिल्या आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित धरणांतील उपलब्ध पाणीसाठी व नियोजन, पाणी व चारा टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, प्रा.देवयाणी फरांदे, नितिन पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी  अभियंता सोनल शहाणे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, यावर्षी जिल्ह्यात  पाऊस कमी झाल्याने धरणांत पाणीसाठा कमी आहे. त्याचप्रमाणे परतीचा पाऊसही पुरेसा पडलेला नाही. आज धरणातील पाणीसाठा लक्षात घेता शेतकरी हिताला प्राधान्य देण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी व चारा या प्रमुख्य महत्वाच्या बाबी असून भविष्यातील परिस्थिती लक्षात घेवून येत्या ऑगस्ट 2024 पर्यंत पुरेल यादृष्टीने पाण्याचे नियोजन करणे निकडीचे आहे. ज्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे त्याचाही समावेश नियोजनात करावा लागणार आहे. जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी समवेत संयुक्तपणे बैठक घेवून शेतकऱ्यांचे व नागरिकांच्या प्रश्न लक्षात घेवून आवश्यक उपाययोजना करावी अशा सूचना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

पालकमंत्री दादाजी भुसे पुढे म्हणाले गणेशोत्सवात परतीचा पाऊस जिल्ह्यातील काही भागात चांगला झाला आहे. त्यामुळे तेथील जनावरांच्या चाऱ्याचा तूर्त प्रश्न मार्गी लागला आहे. परंतु सिन्नर तालुक्यात चारा टंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. येणाऱ्या काळात परतीचा पाऊस पुरेश्या प्रमाणात झाला नाही तर टंचाई परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेवून पाण्याचा वापर काटकसरीने झाला पाहिजे. सिंचनाच्या दृष्टीने पाणी वाटपाची मागील परंपरा  लक्षात घेवूनच नियोजन करण्यात यावे. कृषी सिंचनासाठी पाणी देतांना त्या त्या भागातील  फळबागा व इतर पिकांना, पिकांच्या प्रकारानुसार आवश्‍यकतेनुसार पाणी देण्यात यावे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधीची उपलब्धता करून पशुपालकांना चारा लागवडीसाठी वैरण पिकांचे बियाणे उपलब्ध करून द्यावे तसेच जिल्हा परिषद स्वनिधीतून वैरण विकास योजनेकरीता निधी उपलब्ध करावा. तसेच औद्योगिक क्षेत्रास लागणाऱ्या पाण्याचेही नियोजन करावे असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी या बैठकीत दिले आहेत.

00000000