मनोधैर्य योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी संगणकीय प्रणाली निर्माण करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १० : अवैध मानवी वाहतूकहिंसा आणि लैंगिक शोषितपीडित महिला व बालकांच्या पुनर्वसनासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना राबवित आहेत. शासनाची मनोधैर्य योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी संगणकीय प्रणाली निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध पुनर्वसन प्रक्रिया सक्षमीकरण संदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री कु. तटकरे बोलत होत्या.

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या कीबलात्कारबालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला या गुन्ह्यातील पीडितांना न्याय देण्यासाठीतसेच त्यांना आयुष्यात आणि समाजात पुनर्स्थापित करण्यासाठी राज्य शासन मनोधैर्य योजना राबवीत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आता संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

अनैतिक मानवी तस्करी प्रक्रियेतून सुटका केलेल्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शासकीय शाळेत प्रवेश देऊन त्यांचे शैक्षणिकरित्या सक्षमीकरण करण्यात यावे. याचबरोबर पुनर्वसन गृहातील महिलांना विविध विभागांशी जोडून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच समाजात राहून पुनर्वसन करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री कु.तटकरे यांनी दिल्या.

बैठकीस विप्ला फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद निगुडकर यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

श्रद्धा मेश्राम/स.सं