मुंबई, दि. ११ : जपान येथे नुकताच झालेला ‘भारत मेळा’ राज्याच्या पर्यटनाला चालना देणारा ठरेल असे मत पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या क्षेत्रातील संधी तसेच सांस्कृतिक आणि पारंपरिक वारशाची ओळख जगाला करून देण्यात आली.
जपान येथे ७ ते ११ ऑक्टोबर रोजी ‘भारत मेळ्याचे’ आयोजन केले होते. यामध्ये पर्यटन विभागाचा सहभाग होता या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पर्यटन मंत्री गिरीश महाजन बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते.
मंत्री श्री.महाजन म्हणाले की, ‘भारत मेळा’ हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली आणि समृद्ध पर्यटनाचा जागतिक स्तरावर प्रचार करण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल. ‘भारत मेळा’मधील आपल्या राज्याचा सहभाग म्हणजे जपानमधील आपल्या सहकाऱ्यांसोबत आपल्या राज्याचे पर्यटन विषयक नाते संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. जपानमधून राज्यात येणा-या पर्यटकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमंत्रित करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘रोड शो’च्या माध्यमातून महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा आणि राज्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक संपत्तीचे दर्शन घडविण्यात आले असल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
पर्यटनमंत्री श्री.महाजन म्हणाले की, गड ,किल्ले, ऐतिहासिक वारसा, समृद्ध समुद्रकिनारे, मुंबई आणि बॉलीवूडच्या गजबजाट असलेल्या ऊर्जेपासून ते पश्चिम घाटांच्या शांततेपर्यंत आणि अपरिमित बौद्धमय ऐतिहासिक स्थळांपर्यंत महाराष्ट्र कला आणि परंपरेचा वारसा जपतो आहे. अजिंठा, वेरुळ लेणी, एलिफंटा गुफा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबईच्या व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको यासारखी युनेस्को जागतिक वारसा स्थळे. ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देणे, कोकणच्या सुंदर किनाऱ्यावर मनसोक्त बागडणे आणि राज्याच्या विविधतेचे आरस्पानी दर्शन देणाऱ्या वेगवेगळ्या खाद्यान्नांचा आस्वाद घेणे, कधीही विसरता न येणाऱ्या प्रवासी अनुभवाची ग्वाही देणाऱ्या महाराष्ट्राला एकदा तरी भेट द्यावे, असे आवाहनही पर्यटनमंत्री श्री. महाजन यांनी केले.
प्रधान सचिव श्रीमती रस्तोगी म्हणाल्या की, कोबे येथील ‘भारत मेळा’ हा राज्यातील पर्यटन वाढीसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल. ओसाका येथील ‘रोड शो’, जपानमधील हिरोशिमा आणि ओकायामा येथे पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था आणि प्रवासी व्यापारी यांच्यासोबत पर्यटनाच्या संधी याबद्दल चर्चा करण्यात आली. जपानमधील पर्यटनप्रेमींनी महाराष्ट्राचे वैभव पाहण्यासाठी महाराष्ट्राला नक्की भेट द्यावी. महाराष्ट्र पर्यटन याबाबत अधिक सविस्तर माहितीकरिता कृपया www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
0000
संध्या गरवारे/विसंअ/