महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘वाचन जागर’

मुंबई, दि. 12 – माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्यावतीने ‘वाचन जागर’ या अभिनव उपक्रमातून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर या जन्मगावी होणारा कार्यक्रम हे यंदाच्या वाचन प्रेरणा दिनाचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती, मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांनी दिली आहे.

याचबरोबर दि. 13 ऑक्टोबर रोजी कर्मवीर आ. मा. पाटील महाविद्यालय, पिंपळनेर व दीपरत्न माध्यमिक विद्यालय, पानखेडा, धुळे आणि भीमराव शिंदे महिला महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वाई; दि. 14 ऑक्टोबर रोजी मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर; दि. 15 ऑक्टोबर रोजी ट्विटर वाचन प्रेरणा साहित्य संमेलन; मराठी विश्वकोश कार्यालयात ग्रंथ प्रदर्शन, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या कार्यक्रमांत भाषा आणि भाषांतर, विदेशी मराठी साहित्य, वाचन संस्कृती आणि आव्हाने, मराठी विश्वकोश परिचय, कुमार विश्वकोशातील जीवसृष्टी आणि पर्यावरण, वाचन संवाद आदी विषयांवर मंथन घडून येणार आहे. वाई विश्वकोश कार्यालयातील संपादकीय विभाग व प्रशासकीय विभागाकडून या कार्यक्रमांचे संयोजन करण्यात आले असून या ‘वाचन जागर’ उपक्रमाचा मराठी वाचक, विद्यार्थी यांनी लाभ घेण्याचे आवाहन विश्वकोश मंडळाच्या वतीने सचिव डॉ.श्यामकांत देवरे यांनी केले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/