‘महिला आयोग आपल्या दारी’तून तत्‍पर निर्णयाची खात्री – राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर

बुलडाणा, दि. 13 : गेल्या काही दिवसात ३१ जिल्ह्यात राज्य महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम पार पडला आहे. मुंबईतील कार्यालयात येऊन राज्यभरातील महिलांना तक्रार मांडणं शक्य नसल्याने आयोग जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत आहे. महिला आयोगाचा येत्या काळात राज्याचा दौरा पूर्ण होणार आहे. या माध्यमातून महिलांना तत्पर निर्णयाची खात्री देण्यात आली आहे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात राज्य महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोगाच्या सदस्य आभा पांडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अमोल डिघुळे उपस्थित होते.

श्रीमती  चाकणकर म्हणाल्या, महिला आयोग पुरूषांच्या विरोधात नाही, तर तो विकृतीच्या विरोधात आहे. संविधानाने महिलांना समान दर्जा दिला आहे. महिलांना दिलेला हा सन्मान हा पुरूषांविरोधात नाही, तर तो पाठीशी राहण्यासाठी आहे. सन्मानाने जगत असतांना महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच महिलांना शिक्षीत करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी यातना सोसल्या त्यांचे अनुकरण होणे गरजेचे आहे. महिलांसाठी असलेले हिंदू कोड बिल आणि महिलांच्या हक्काचे संरक्षण झाल्यास समस्या राहणार नाही.

कौटुंबिक हिंसाचारपासून राज्य महिला आयोगाचा प्रवास आता बदलत आहे. बेपत्ता होण्याचे प्रमाण, सायबर गुन्ह्यांत होणारे महिलांचे शोषण, गर्भलिंग निदान चाचणी, माता व बाल मृत्यू याबाबत महिला प्रश्न विचारत नाही. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायदा किंवा प्रशासनाने अंकूश ठेवणे अभिप्रेत नसून प्रत्येक व्यक्तीने याची सुरूवात स्वत:पासून करावी लागणार आहे. महिलांच्या वाट्याला संघर्ष आले, त्यामुळे त्या शेवटचा पर्याय म्हणून आयोगासमोर आले आहे. यात त्यांना मिळणारा न्याय त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणरा ठरणार आहे. लेक लाडकी अभियानातून मुलींना लखपती करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी, महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन सक्षमीकरण करावे. सामाजिक विकास हा आर्थिक विकासातून होत असल्याने महिलांनी बचतगटासारख्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा. जिल्ह्यात लिंगगुणोत्तर प्रमाण खालावत चाललेला असताना याची जाण समाजाला असणे आवश्यक आहे. प्रगती साधण्यासाठी महिलांनी सामाजिक रित्या उन्नत व्हावे. असे आवाहन केले.

जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. कडासने यांनी, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी पोलिस सदैव तयार आहे. तक्रार देणारा व्यक्ती हा पोलिसांसाठी महत्वाचा आहे. मुलींचा जन्म हा अत्यंत सुखकारण असल्याचे त्यांनी सांगितले.

अमोल डिघुळे यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्यात महिलांसाठी असलेल्या समूपदेशन केंद्राची माहिती दिली.

सखी वन स्टॉप सेंटरला भेट

जिल्हा रूग्णालयात असलेल्या सखी वन स्टॉप सेंटरला श्रीमत  चाकणकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी याठिकाणी महिलांसाठी असलेल्‍या व्यवस्‍थेची पाहणी केली. महेंद्र सौभागे यांनी सेंटर विषयी माहिती दिली. श्रीमती  चाकणकर यांनी याठिकाणी वृक्षारोपण केले.