अभिवाचन, काव्यवाचनाने मंत्रालयात साजरा झाला ‘वाचन प्रेरणा दिन’

मुंबई, दि. १३ : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अभिवाचन आणि काव्यवाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा केला.

मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच भाषेच्या प्रचार व प्रसाराच्या हेतूने मराठी भाषा विभागाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी येणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात अभिवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अभिवाचनासाठी शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त ‘350 वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा, उत्सव शिवचरित्रपर पुस्तकाच्या वाचनाचा’ हा विषय निवडण्यात आला.

या अभिवाचन आणि काव्यवाचन कार्यक्रमात सर्वश्री ज्ञानेश पाटमासे, अतुल कुलकर्णी, अजय सावद, दीपक दळवे, अरविंद शेटे, श्रीमती अनघा पटवर्धन, सोनाक्षी पाटील, शिल्पा नातू, सारिका चौधरी, पूजा भोसले, मंगल नाखवा आदींनी सहभाग घेऊन वृत्तपत्रातील लेख, शिवचरित्रात्मक पुस्तकांतील उतारा, कविता वाचन, ओवी गायन, गीत गायन, बखरीतील लेख, शिवरायांचे मूळ मोडी लिपितील पत्र व त्याबाबतचे विवेचन असे विविधांगी वाचन आणि गायन सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन वासंती काळे यांनी केले.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले. यात मराठी भाषा विभागाच्या अखत्यारीतील विविध मंडळे, शासकीय मुद्रणालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या स्टॉलचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली. तसेच अभिवाचन कार्यक्रमास उपस्थित राहून अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला.

०००

बी.सी.झंवर/विसंअ