‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. १६ – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रम राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, या कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार करण्यात आला असून या कार्यक्रमातील समाविष्ट कामे, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रम राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती, त्याअनुषंगाने या कार्यक्रमाचा ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत आज आढावा घेण्यात आला. मुख्य सचिव मनोज सौनिक यांचेसह विविध शासकीय विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते.

नमो महिला सशक्तीकरण अभियानातून २ कोटी महिलांचा बचत गटांमध्ये समावेश करा

‘नमो ११ कलमी’ कार्यक्रमाच्या नमो महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या राज्यातील ६० लाख महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या असून ही संख्या २ कोटी करण्यासाठी ग्रामविकास, महिला व बालविकास विभागाने प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. राज्य सरकारने यापूर्वीच बचत गटांच्या सीआरपींच्या मानधनात तसेच खेळत्या भांडवलात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बचत गटांच्या उत्पादनांचे ब्रॅंडिंग आणि विपणन करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. महानगरपालिका, नगरपालिकेच्या विविध ७२ बाजारपेठांमध्ये महिला उद्योग केंद्रांसाठी जागा दिली जाणार असून इतरही शहरांमध्ये अशा प्रकारची जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. मॉलमध्ये देखील बचत गटांच्या उत्पादनांची विक्री व्हावी, त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने विभागाने प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. राज्यात ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच

देशाच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या हातांचा सन्मान करण्यासाठी ‘नमो कामगार कल्याण’ अभियानातून ७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. तीन महिन्यात हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

७३०० शेततळ्यांची उभारणी

नमो शेततळी अभियानातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचा प्रयत्न असून त्यासाठी ७३०० शेततळ्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

७३ आत्मनिर्भर गावे विकसित होणार

या अभियानातून राज्यातील ७३ गावे आत्मनिर्भर गावे विकसित करण्यात येणार असून त्यासाठी पक्की घरे, शौचालयांची बांधणी व त्याचा वापर, रस्त्यांचे जाळे, महिला सक्षमीकरण, गावातच रोजगाराची उपलब्धता, सौर ऊर्जेचा वापर आदी बाबींवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियानातून विकास

गरीब आणि मागासवर्गीय वस्त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी हे अभियान राबविण्यात येत असून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरे बांधून देण्यासाठी विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, या घर-वस्त्यांमध्ये वीज पुरवठा, रस्ते, समाजमंदिराची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

प्रत्येक जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी

सर्व आधुनिक सुविधांयुक्त ग्रामपंचायत कार्यालयांच्या उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी करण्यात येणार असून विभागाने प्राधान्याने ग्रामसचिवालयांची कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

७३ आदिवासी शाळा होणार स्मार्ट

राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या ३० प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारितील ४९७ आश्रमशाळांपैकी ७३ शाळा स्मार्ट करण्यात येणार आहेत. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन इतरांसाठी आदर्शवत होतील, अशा शाळांची उभारणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

दिव्यांगांसाठी ७३ पुनर्वसन केंद्रे

राज्यात ७३ ठिकाणी दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करण्यात येणार असून यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याच्या सूचना देऊन यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या केंद्रांमधून, दिव्यांगांचे सर्वेक्षण, ओळख, दिव्यांगांना आवश्यक साहित्याची उपलब्धता, विविध योजनांचा लाभ आदी सुविधा पुरविण्याच्याही सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

७३ गावांमध्ये मुलांसाठी क्रीडा मैदाने

तालुक्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ७३ गावांमध्ये मुलांसाठी क्रीडा मैदाने विकसित करण्याची कार्यवाही सुरु करा, ही मैदाने सगळ्यांना उपलब्ध होतील यादृष्टीने ठिकाणे निश्चित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

७३ शहर सौंदर्यीकरणाचा शासन निर्णय जारी

नमो शहर सौंदर्यीकरण अभियानातून राज्यातील २५ महानगरपालिका आणि ४८ नगरपालिकांमध्ये सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे, त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

७३ मंदिरांच्या विकासासाठी तांत्रिक मान्यतेची कार्यवाही

राज्यातील मंदिरांच्या विकासासाठी ७३ मंदिरे निश्चित करण्यात आले असून तांत्रिक मान्यतेची कार्यवाही सुरु आहे. जिल्हा विकास योजना, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि राज्य अर्थसंकल्पातून या मंदीर विकासाचा खर्च करण्यात येणार असून या कामांना गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

०००००