‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त राज्य मराठी विकास संस्थेमार्फत अभिवाचन आणि कवितांची मैफिल

मुंबई, दि. 16 : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्सच्यावतीने आज अभिवाचन आणि काव्य गायनाची मैफिल आयोजित करण्यात आली. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे हा कार्यक्रम झाला.

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा जागर करणाऱ्या ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या शिवचरित्राचे यावेळी अभिवाचन करण्यात आले. अभिनेता विराजस कुलकर्णी, अभिनेत्री लतिका सावंत तसेच निवेदक मंदार खराडे यांनी यात सहभाग घेतला. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध परंपरेतील काही लेखकांच्या साहित्याचे अभिवाचन आणि काही निवडक कवितांच्या ‘बोलतो मराठी’ या सुरेल मैफिलीचेही आयोजन करण्यात आले. यात अभिनेता सौरभ गोखले, अभिनेत्री मानसी जोशी, प्राजक्ता दातार, गायक श्रीरंग भावे आणि गौरी पंडित यांनी सहभाग घेतला.

अभिवाचनात श्रीमान योगी, वेध महामानवाचा मधील कांचनबारीच्या लढाईचा प्रसंग, गो.नी. दांडेकर यांच्या हे तो श्रींची इच्छा या कादंबरीतील शिवराज्याभिषेकातील प्रसंग आदींसह सदानंद रेगे, बहिणाबाई चौधरी, बा.भ.बोरकर, विं.दा. करंदीकर, गंगाधर गाडगीळ, ग्रेस, जी.ए. कुलकर्णी, ना.धो. महानोर, आरती प्रभू आदींच्या साहित्य आणि कवितांचे वाचन आणि गायन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांनी माय मराठीचा प्रचार प्रसार होण्यासाठी राज्य मराठी विकास संस्था वर्षभर विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगून वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुया गरवारे – धारप यांनी केले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/