‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रां’चे गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई दि.१७- ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार १९ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्यातील ५०० ग्रामपंचातींमध्ये ही केंद्र सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी व्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण  संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी  उपस्थित होते.

मंत्री श्री लोढा म्हणाले की, “राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये एकही कौशल्य विकास केंद्र नव्हते. कौशल्य विकास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्या अनुषंगाने त्यांच्या संकल्पनेनुसार ५०० ग्रामपंचातींमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला असून येत्या १९ ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.

रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये, त्या दृष्टीने कौशल्य विकास केंद्रांची संकल्पना महत्वाची असून भविष्यात राज्यातील या केंद्रांची संख्याही वाढविण्यात येईल. हा कार्यक्रम राज्यस्तरावर होणार असल्याने कौशल्य विकास, उद्योग यांच्याबरोबरच महसूल, ग्रामविकास यांच्यासह महिला व बालविकास विभागांचा यामध्ये सहभाग असणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्या- ज्या गावांत हे केंद्र सुरु होणार आहे. त्याच्या आजूबाजूच्या गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध घटकांचा कार्यक्रमात सहभाग वाढावा यासाठीचे नियोजन करण्यात येणार आहे.

लोकप्रतिनिधींसह आशा व अंगणवाडी सेविका आदीं या कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनात सहभाग नोंदवतील. विश्वकर्मा योजनेशी संबंधित लाभार्थी आणि अन्य घटकांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

०००००

संध्या गरवारे/विसंअ/