मुंबई, दि. १७ : कुक्कुट उत्पादनाद्वारे कोरोना विषाणू मानवी आरोग्यास धोका पोहोचवू शकतो ही बाब पूर्णतः अशास्त्रीय व निराधार असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, मोबाईलवर अशा अफवा पसरविणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यात येत असून अशा अफवांविषयी नागरिकांनी दक्ष रहावे, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केले आहे.
श्री.केदार म्हणाले, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सोशल मीडिया उदा. फेसबुक, व्हॉट्सॲपवर, युट्युबवर कुक्कुट मांस व इतर उत्पादने यांच्या आहारातील समावेशाबाबत विविध अशास्त्रीय बाबी पसरवल्या जात आहेत. अशा अफवांमुळे कुक्कुट खाद्य निर्मिती व कुक्कुट पालनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. या उत्पादनाद्वारे कोरोना विषाणू मानवी आरोग्यास धोका पोहोचू शकतो हे पूर्णतः अशास्त्रीय व निराधार आहे, असे त्यांनी सांगितले.
चिकन अंडी खाल्ल्याने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होतो, अशी व्हिडिओद्वारे खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्यांची गांभीर्याने दखल घेत सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एकाला आंध्रप्रदेशातून तर दुसऱ्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे. अफवा पसविणाऱ्यांचा शोध सुरु असून त्यांच्यावरही गंभीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे पोल्ट्री व्यवसाया करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, असे श्री.केदार यांनी सांगितले.
0000
राजू धोत्रे/विसंअ/17.3.2020