सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्रात वाढवण बंदरामुळे मोठे बदल होतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 19 :- भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सागरी क्षेत्राची क्षमता महत्त्वाची ठरणार असून महाराष्ट्रातील वाढवण बंदरामुळे सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्रात मोठे आश्वासक बदल होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘एमएमआरडीए’ मैदान येथे तिसऱ्या ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट (GMIS) २०२३ च्या समारोप सत्रात उपमुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.

यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, केंद्रीय जहाज आणि बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल, केंद्रीय जहाज आणि बंदरे राज्यमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय राज्यमंत्री मंत्री शंतनू ठाकूर, केंद्रीय आयुष मंत्री डॉ मुंजपारा महेंद्रभाई , बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे, खासदार गोपाळ शेट्टी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट मुंबईत, महाराष्ट्रात होत आहे ही विशेष आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राला सागरी इतिहासाची महान परंपरा आहे. अगदी हडप्पा संस्कृतीपासून सागरी व्यापाराच्या नोंदी आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच सागरी शक्ती ओळखून आरमाराची उभारणी केली. सरखेल कान्होजी आंग्रे यामध्ये अग्रेसर होते. देशाची ही सागरी शक्ती ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील 9 वर्षात देशात बंदरे आणि जहाज बांधणी क्षेत्रात भक्कम पायाभूत सुविधांची उभारणी झाली आहे. अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. यामुळे आज आपला देश सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्रात एक महत्त्वाची शक्ती म्हणून उदयाला आला आहे.

‘सागरमाला’सारख्या योजना, लॉजिस्टिकसंदर्भातील धोरण, ‘ग्लोबल सप्लाय चेन’संदर्भातील विविध करार या क्षेत्रातील विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टनेही अनेक विकासकामे हाती घेतली असून सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी आहे. माझगाव डॉकचे या क्षेत्रातील योगदानही महत्त्वपूर्ण आहे. भारतात शीप बिल्डिंग क्षेत्रही मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. राज्यातही यासंदर्भातील धोरण तयार करण्यात आले असून या क्षेत्रासाठी आवश्यक इको सिस्टिम तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धताही आहे. या क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूकीच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. राज्यात शीप बिल्डिंग क्षेत्रालाही भक्कम आधार दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मच्छिमार बांधवांना सोबत घेऊनच वाढवण बंदराचा विकास

राज्यातही बंदरे व जहाज बांधणी क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे. वाढवण बंदर हे देशातील सर्वात मोठे बंदर ठरणार असून त्यामुळे राज्याचा सर्वसमावेशक विकास साध्य होण्यास मदत होईल. सध्या देशातील सुमारे ६५ टक्के कंटेनर वाहतूक ही ‘जेएनपीटी’ बंदरातून केली जाते. वाढवण बंदराची क्षमता त्याच्या तिप्पट असून मोठ्या जहाजांसाठी आवश्यक अशी समुद्राची सर्वाधिक खोली (शॅफ्ट) वाढवण बंदरात उपलब्ध आहे. वाढवण बंदर मोठ्या जहाजांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तेथील मच्छीमार बांधवांना सोबत घेऊनच येथे विकास करण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी सागरी व जहाज बांधणी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचा गौरव करण्यात आला.

या शिखर परिषदेत युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, आशिया (मध्य आशिया, मध्य पूर्व आणि बिमस्टेक क्षेत्रासह) अशा जगभरातील  विविध  देशांच्या मंत्र्यांनी सहभाग घेतला. या शिखर परिषदेला जगभरातील उद्योगांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी, व्यावसायिक नेते, गुंतवणूकदार, आणि इतर भागधारक उपस्थित होते.

—–000——-

केशव करंदीकर/विसंअ/