मुंबई, दि. २० :- दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय आणि मराठी चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटासारखे दर्जेदार चित्रपट मराठीमध्ये तयार व्हावेत. मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदीरमध्ये दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीला आर्थिक अनुदान वितरणप्रसंगी मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी तब्बल ८९ मराठी चित्रपटांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अविनाश ढाकणे, सहसंचालक संजय पाटील, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, चित्रपट परीक्षण समितीचे सदस्य अभिजीत साटम, मधुरा वेलणकर, स्वप्निल दिगडे, विनोद सातव, गीतांजली ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले, प्रथमच २९ कोटी ८५ लाख रुपयांचे ८९ चित्रपट निर्मात्यांना अनुदान देण्यात येत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठीमध्ये विविध प्रकारचे चित्रपट तयार होत आहेत. पात्र चित्रपटांना अनुदान देण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्यात येत आहेत. चित्रपटसृष्टीचा विकास व्हावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत यापुढे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना दुप्पट अनुदान तर चित्रपटाची महिला दिग्दर्शक असेल तर त्यांना पाच लाख रुपये जास्त अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे. शिवाय चित्रपटांसोबत डॉक्युमेंटरीसाठीही अनुदान देता येईल का, याची चाचपणी करण्याच्या सूचना त्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला दिल्या. मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांनी दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून उत्तुंग भरारी घ्यावी.
मराठी चित्रपटांना थिएटर मिळण्यासाठी थिएटरचे परवाने रिन्यू करणार नाहीत त्यांना दंडात्मक कारवाई करण्यासाठी शासन प्रयत्न करेल, चित्रपटाच्या शूटिंगसाठी राज्यात ६५ ठिकाणे उत्तम असून त्यांचा विकास करून शूटिंगला देण्याचा विचार केला जाईल, यामुळे निर्मात्याचे पैसे वाचणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मराठी चित्रपट निर्मात्यांनी केवळ मनोरंजन म्हणून चित्रपटाकडे न पाहता त्यातून संस्कार, ज्ञान मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.
श्री. खारगे यांनी सांगितले की, संस्कृतीचे जतन, संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग कार्यरत आहे. लोकशिक्षण, समाज प्रबोधन मराठी चित्रपटातूनही होत आहे. यातून रोजगार निर्मिती सुद्धा होत असून कोल्हापूर आणि गोरेगाव येथील फिल्म सिटी अत्याधुनिक आणि कायापालट करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. आव्हाने खूप असली तरी दर्जेदार चित्रपटावर भर द्यावा. आंतरराष्ट्रीय स्तरावर, कान्समध्येही अधिकाधिक मराठी चित्रपटांची वर्णी लागावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी दशक्रिया चित्रपटाच्या निर्मात्या कल्पना कोठारी, अरुण नलावडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ ढाकणे यांनी प्रास्ताविक केले.
फेब्रुवारी २०२३ ते जून २०२३ या कालावधीत एकूण १७४ चित्रपट परीक्षण करण्यात आले आहेत. त्यापैकी ‘अ’ दर्जा प्राप्त चित्रपट ३७, ‘ब’ दर्जा प्राप्त चित्रपट ४८, राज्य-राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त चित्रपट ०४ असे एकूण ८९ चित्रपटांना अनुदान वितरण करण्यात आले. यामध्ये दशक्रिया, बारडो, बापजन्म, रेडिमिक्स, बॉईज, सुरसपाटा, एक सांगायचंय, मिस यू मिस्टर, वेडिंगचा सिनेमा, स्माईल प्लिज, येरे येरे पावसा, मन उधान वारा आदींसह ८९ चित्रपटांना मान्यवरांच्या हस्ते २९ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला.
000
धोंडिराम अर्जुन, स.सं