कुष्‍ठरोग्यांना तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करावे – आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार

मुंबई, दि. २१ :  राज्यात घरोघरी सर्वेक्षण करून, कुष्‍ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम काटेकोरपणे राबवावी.  शोध मोहीमेदरम्यान नागरिकांचे या आजाराबाबतचे गैरसमज दूर करावे. नागरिकांना  हा आजार बरा होण्याचा विश्वास देवून  तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करावे, असे राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितले.

राज्यात २० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०२३ या कालावधीत आरोग्य विभागाच्या वतीने, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कुष्‍ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

सामाजिक कारणाने कुष्‍ठरोग लपवण्याकडे  लोकांचा, विशेषतः महिलांचा कल असल्याचे सांगत आयुक्त श्री. कुमार म्हणाले की,  आरोग्य विभागाने सोशल मिडिया, सामाजिक संस्था व इतर माध्यमाद्वारे लोकांचे प्रबोधन करून, योग्य उपचाराने हा आजार बरा होतो असा विश्वास निर्माण करावा. अधिकाधिक संशयित रुग्णांची तपासणी करावी. या मोहिमेसाठी स्थानिक जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन घ्यावे, अशा सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. पंतप्रधान व राज्याचे आरोग्य मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली  सन २०२७ पर्यंत शून्य कुष्‍ठरोग प्रसाराचे ध्येय  गाठण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहनही  त्यांनी यावेळी केले.

२० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या संयुक्त कुष्‍ठरोग व सक्रीय क्षयरोग शोध मोहिमेसाठी राज्यभरात ६५,८३३  पथके तयार करण्यात आली आहेत. एक पथक एका दिवसात शहरी भागातील २५ आणि ग्रामीण भागातील २० घरांना भेटी देणार आहे.  गृहभेटी अंतर्गत राज्यातील १ कोटी ७५ लाख घरांचे सर्वेक्षण केले जाणार असून, अंदाजे ८ कोटी ६६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण होईल, अशी  माहिती आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत यांनी यावेळी दिली.  नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

०००

निलेश तायडे/वि.सं.अ./