पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई, दि. २३ : विधानपरिषदेत पदवीधर मतदार संघात मतदानासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंत्रालयासह मुंबईत १२ ठिकाणी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन दिवसीय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना नोंदणी करण्यासाठी त्रिमुर्ती प्रांगणात ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने २३,२५ व २६ ऑक्टोबर कालावधीत तीन दिवसीय जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रविंद्र राजपूत, पदनिर्देशित अधिकारी डॉ. विजयकुमार सुर्यवंशी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

 मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी 30 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2023  या कालावधीत ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी http://gterollregistration.mahait.org  या संकेत स्थळास भेट देऊ शकता. या शिबिरात कोकण आणि मुंबई मतदार संघातील पदवीधर मतदार नोंदणी करू शकणार असल्याची माहितीही मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

पदवीधर मतदार संघासाठी मतदार भारताचा नागरिक असावा, मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असावा. 1 नोव्हेंबर 2023 च्या किमान 3 वर्षे आधी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी प्राप्त पदवीधर असणे आवश्यक आहे.  यासाठी रहिवासी पुरावा (मतदार ओळखपत्र/ आधार कार्ड / पासपोर्ट / वाहन चालक परवाना / वीज-पाणी-गॅस जोडणीचे देयक इत्यादी),  विद्यापीठ किंवा संबंधित संस्था  यांनी दिलेले पदवी प्रमाणपत्र / गुणपत्रिका / समकक्ष पदवी प्रमाणपत्र, कागदपत्रातील नावात बदल असल्यास राजपत्र/ विवाह नोंदणी प्रमाणपत्र / संबंधित कायदेशीर पुरावा असणे आवश्यक आहे. अर्ज मुख्य निवडणूक अधिकारी , विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच  https://rb.gy/thjo6 या लिंकवर अर्ज डाऊनलोड करता येईल.

मुंबई जिल्ह्यातील वस्तू व सेवा कर विभाग भायखळा, जे.जे. हॉस्पिटल,  जी.टी.हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, श्रीमती नाथाबाई ठाकरसी महिला विद्यापीठ, मरीन लाईन, मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनंस, पश्चिम रेल्वे, चर्चगेट, आर.बी.आय. फोर्ट, सह आयुक्त मुंबई महानगर पालिका या विविध 12 शासकीय कार्यालयांमध्ये या तीन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

०००००