नागपूर दि. २३ : महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी तिरंदाजी या क्रीडा प्रकारात सातत्य दाखविले असून याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. महाराष्ट्रात या क्रीडा प्रकारासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यास शासन कटीबद्ध आहे. राज्याला तिरंदाजीची भूमी बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदक जिंकणाऱ्या ओजस देवतळे या नागपूरकर तिरंदाजाच्या घरी जाऊन त्याचे कौतुक करणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आई-वडिलांशी बोलताना स्पष्ट केले होते. आज आपल्या व्यस्त कार्यक्रमात त्यांनी ओजसच्या घरी जाऊन त्याच्याशी हितगूज साधले. यावेळी आशियाई स्पर्धेत ओजससोबत सुवर्णपदक पटकवणारा अमरावतीचा तुषार शेळके, साताऱ्याची आदिती स्वामी हे तिरंदाजही तसेच ओजसचे क्रीडा मार्गदर्शक प्रवीण सावंतही उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी तीनही खेळाडूंना त्यांच्या आशियाई स्पर्धेतील अनुभवाविषयी विचारले. याशिवाय राज्य शासनाकडून खेळाडूंची काय अपेक्षा आहे हे देखील जाणून घेतले. ओजसने नागपूरमध्ये आणखी सुविधा निर्माण करण्याची मागणी केली. तर आदिती व तुषार शेळके यांनीही प्रत्येक शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावर उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, नागपूर शहरामध्ये मानकापूर विभागीय क्रीडा संकुल तसेच जिल्हा क्रीडा संकुल (कामठी ) नागपूर येथे तिरंदाजी या क्रीडा प्रकारासाठी जागतिक दर्जाच्या सोयी सवलती उपलब्ध होण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या अन्य भागातही तिरंदाज तयार व्हावेत. यासाठी चांगल्या सुविधा दिल्या जातील. यापूर्वीही अनेक खेळाडूंनी तिरंदाजी या प्रकारामध्ये चांगले यश दाखविले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तिरंदाजांसाठी चांगल्या सुविधांची उपलब्धता करणे राज्य शासनाची प्राथमिकता आहे. महाराष्ट्राला तिरंदाजीमध्ये अग्रेसर करण्याकडे आमचा कल आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेमध्ये दहापट वाढ केल्याबद्दल या तीनही खेळाडूंनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.
उपमुख्यमंत्र्यांनी रक्कम वाढविण्याचे श्रेय खेळाडूंना दिले. ते म्हणाले, खरे म्हणजे तुमच्या पराक्रमाने आमचा हुरुप वाढतो. तुम्ही पदकं मिळवत राहावे, आम्ही सुविधा उपलब्ध करू. महाराष्ट्राचे नाव आपण मोठे करावे, देशाचे नाव आपण मोठे करावे.
उपमुख्यमंत्र्यांनी या भेटीदरम्यान पुन्हा एकदा त्यांनी ओजसच्या आई-वडिलांचे कौतुक केले. ओजसने नागपूरचे व महाराष्ट्राचे नाव मोठे केल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले. ओजसच्या परिवारातील अनेक सदस्यासह जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
०००