बबनराव ढाकणे यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 27 :- सर्वसामान्यांसाठी जनकैवारी म्हणून परिचित असणारे, लोकहिताकरिता संघर्षासाठी सदैव सज्ज असणारे नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

            शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, “विद्यार्थी चळवळीतून आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस सुरुवात करीत त्यांनी राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. गोवा मुक्तीसंग्रामातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. एक संघर्षशील आणि आक्रमक राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख होती. ऊसतोडणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी कामगारांचे प्रश्न हिरीरीने मांडले. बाजार समितीच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला प्रारंभ करून थेट केंद्रीय मंत्री पदापर्यंत मजल मारली”.

            “जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर, विशेषतः दुष्काळावरील उपाययोजनांसाठी त्यांनी केलेला संघर्ष हा राजकारण आणि समाजकारणात येणाऱ्या पुढील पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक राहील. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्त‍िमत्वास मुकलो आहोत. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो तसेच त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना”, या भावनांसह मुख्यमंत्र्यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

            माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

००००