राज्य आपत्ती व्यवस्थापन दल प्रशिक्षण केंद्र कोयनानगर येथे स्थापण्याचा प्रस्ताव गृह विभागाने तयार करावा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि.6 : सातारा जिल्ह्यातील कोयनानगर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन दल प्रशिक्षण केंद्र निर्मितीचा प्रस्ताव गृह विभागाने तातडीने सादर करावा, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

कोयनानगर येथे नियोजित असलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दल, पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राच्या सद्यस्थितीचा आढावा बैठक आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, कोयनानगर येथे नियोजित असलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दल व पोलीस प्रशिक्षण उपकेंद्रासाठी जागा मिळाली आहे. यामध्ये खेळाचे मैदान, कवायत मैदान, निवासी बांधकाम, प्रशासकीय इमारत यासाठी आवश्यक आराखडा तयार करण्यात यावा.

या बैठकीस विशेष पोलिस महानिरीक्षक अशोक मोराळे (राज्य राखीव पोलीस बल, पुणे) गृह विभागाचे सहसचिव अ. ए. कुलकर्णी, वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहीफळे, सहायक पोलिस महानिरीक्षक विजय खरात उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ