शालेय विद्यार्थी घेणार प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

मुंबई, दि. 7 : दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी करुन वायू व ध्वनीचे प्रदूषण होत असते. या वर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी केली जावी, याकरीता ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान – 2023’ अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्यावतीने उद्या बुधवार 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शपथ दिली जाणार आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे.

गेल्या काही वर्षात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या व्यापक जनजागृतीमुळे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी आजही याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे. त्याच उद्देशाने मंडळामार्फत दरवर्षी विविध उपक्रम हाती घेतले जातात. फटाक्यांमुळे होणारे हवा आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना राबविली जाते. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत त्याचे महत्व पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. या कार्यक्रमाला बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

 

00000

दीपक चव्हाण/विसंअ/