मुंबई, दि.७ :- मौजे-मेढा हनुमाळ माळी शिंगरकोंड (मोरेवाडी), तिसे या गावातील आणि रायगड जिल्ह्यातील दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. दरडग्रस्त पुनर्वसनाबाबत विविध समस्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बैठकीत मांडल्या.
मंत्रालयातील दालनात रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, रायगड जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्रातील गावांचे कायमस्वरूपी करावयाचे पुनर्वसनाबाबत स्थानिक प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. शासनाकडून आलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही केली जाईल, त्याचबरोबर म्हसळा तालुक्यातील लिपनी वावे व मोहम्मद खनीखार या गावाच्या पुनर्वसन प्रस्तावावर जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
दरडग्रस्त पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही व्हावी – मंत्री कु. आदिती तटकरे
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, मौजे मेढा हनुमाळ माळी गावचे पुनर्वसन करणे,मौजे तिसे येथे दरड कोसळल्या बाबत, भिंगारकोड (मोरेवाडी) या गावातील दरड ग्रस्त कुटुंबीयांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्याबाबत रायगड जिल्ह्यातील दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने कार्यवाही होणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाकडून मदत व पुनर्वसन विभागाला आलेल्या प्रस्तावांना लवकर मान्यता मिळावी अशी मागणी केली जेणेकरून या प्रस्तावाची कामे तातडीने सुरू करतील असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, उपसरपंच वरसगाव राकेश शिंदे, पुनवर्सन विभागाचे अधिकारी, उपसरपंच (तिसे) राजेश कदम, सरपंच संगे संजय सानप,मेढाचे सदानंद गोवर्धने,जयंत गोवर्धने,तिसे ग्रामपंचायत सदस्य महेश पवार,संभेचे गणेश सानप,संदेश सानप यावेळी उपस्थित होते.
००००
संध्या गरवारे/विसंअ