मुंबई, दि. 7: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्यावतीने 8 ते 14 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत ‘पु. ल. कला महोत्सव 2023’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उद्या बुधवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलांगण प्रांगणात होणार आहे.
रसिकांना या महोत्सवात साहित्य, गायन, वादन, नृत्य, नाट्य अशा विविध कला प्रकारांवर आधारित अनेक कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे. उद्घाटनानंतर कलांगण येथेच काफिला, कोल्हापूर या संस्थेचा मराठी, हिंदी, उर्दू, प्रेम साहित्यावर आधारित ‘जियारत’ हा कार्यक्रम सादर होईल. या महोत्सवात 14 नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
‘पु. ल. कला महोत्सवांमध्ये सादर होणारे विविध कार्यक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य आहेत. तरी सर्व पुलप्रेमींनी तसेच कलासक्त रसिकजनांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.
00000
दीपक चव्हाण/विसंअ