मुंबई दि ७ :- ‘धरणांच्या देशा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, धरणांसंदर्भातील कॉफी टेबल बुकची संकल्पना अतिशय अभिनव आणि उपयुक्त असून या निमित्ताने जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांच्या इतिहासाचे जतन होणार आहे. अभ्यासकांसाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरेल असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
अपर मुख्य सचिव दीपक कपूर म्हणाले, जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सिंचन प्रकल्प हाती घेण्यात येतात. देशातील एकूण मोठ्या धरणांपैकी सुमारे ४० टक्के धरणे महाराष्ट्रात असून सह्याद्री पर्वताच्या कुशीत तसेच सखल भागात पाणी उपलब्धता विचारात घेऊन ही धरणे बांधण्यात आली आहेत.
धरणे आणि त्यांचे जलाशय यामुळे नवीन परिसंस्था उदयाला येतात. निसर्गरम्य परिसरामुळे ही धरणस्थळे प्रेक्षणीय स्थळे म्हणून नावारुपाला आली आहेत. या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून निवडक धरणांची छायाचित्रे तेथील अभियांत्रिकी कौशल्याचे आणि नैसर्गिक सौंदर्याचे निसर्गरम्य देखावे राज्यातील जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही श्री कपूर यांनी सांगितले.
आभार प्रदर्शन सचिव डॉ. संजय बेलसरे यांनी केले तर सूत्रसंचालन उप सचिव प्रविण कोल्हे यांनी केले.
—–000—–