सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमांतर्गत राज्यात ६०० संस्था होणार ‘सुमन’ संस्था – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 22 : सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम (सुमन) कार्यक्रमांतर्गत राज्यात सन 2023-24 वर्षासाठी 600 संस्थांची ‘सुमन’ संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील 600 संस्था सुमन संस्था होणार आहेत. यामध्ये 538 आरोग्य संस्थांची सुमन बेसिक म्हणून, 47 आरोग्य संस्थांची बेसिक इमर्जन्सी ऑब्सेट्रीक ॲण्ड न्यू बॉर्न केअर व 15 आरोग्य संस्थांची कॉम्प्रेहेन्स‍िव्ह इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर या प्रकारात निवड करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमांतर्गत राज्यातील आरोगय संस्थांची  सुमन संस्था म्हणून निवड करून त्यांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याचा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा मानस आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सुमन संस्थांची संकल्पना मूर्तरुपात आणण्यात येत आहे.  आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहे. राज्यात 600 संस्था सुमन संस्था म्हणून निवड करण्याचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे.

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमाचे (सुमन) ध्येय हे,  टाळता येण्याजोग्या कारणांमुळे होणारे माता व बालमृत्यू, आजार संपुष्टात आणून प्रसूतीचा सकारात्मक अनुभव प्राप्त करणे आहे.  सुमन अंतर्गत सर्व लाभार्थींना उच्च दर्जाच्या वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा, संदर्भ सेवा देणे, लाभार्थ्यांना उपलब्ध सोयी सुविधांची नियमित माहिती देण्यासाठी आणि तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणारी प्रभावी आरोग्य सेवा प्रणाली निर्माण करणे, स्वयंसेवी संस्था, स्वयंसहाय्यता गट, लोकप्रतिनिधी यांची 100 टक्के माता मृत्यूच्या नोंदणीसाठी मदत घेणे व त्या मृत्यूच्या अन्वेषणासाठी जनजागृती निर्माण करणे, आरोग्य सेवा पुरविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे ज्ञान, कौशल्य बळकटीकरण करून त्यांच्यामध्ये लाभार्थींच्या हक्काबाबत जागृती निर्माण करणे, लाभार्थ्यांना गुणात्मक सेवा देण्यासाठी प्रवृत्त करणे, आंतरविभागीय समन्वय साधण्यासाठी कृती योजना तयार करणे ही सुमन कार्यक्रमाची वैशिष्ट्य आहे.

या कार्यक्रमांतर्गंत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये येणाऱ्या सर्व गर्भवती महिला, नवजात बालकांना आवश्यक आरोग्य सेवा मोफत देण्यात येणार आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध संसाधनांच्या आणि सेवांच्या आधारे सेवा हमी पॅकेजनुसार सुमन बेसिक, सुमन बेसिक इमरजन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर आणि सुमन कॉम्प्रेहेन्स‍िव्ह इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर याप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच सुमन कॉम्प्रेहेन्स‍िव्ह इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर यामध्ये जिल्हा, स्त्री रूग्णालये व संदर्भ सेवा केंद्रे यांचा समावेश आहे. सुमन बेसिक इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर यामध्ये प्रथम संदर्भ सेवा केंद्र नसलेल्या काही उपजिल्हा रूग्णालये व ग्रामीण रूग्णालये यांचा समावेश आहे. तसेच सुमन बेसिकमध्ये राज्यस्तरावरील संस्थांमध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही समावेश आहे, या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला अधिकाधिक दर्जेदार व सहज आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे निश्चितच राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल, असा विश्वासही आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी व्यक्त केला आहे.

 

००००

नीलेश तायडे/विसंअ/