केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेस प्रारंभ

0
10

नागपूर,  दि.24 :  महानगरपालिकेच्या विकसित संकल्प यात्रेचा प्रारंभ आज दाभा येथील ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनादरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिकेच्या उपायुक्त आंचल गोयल, माजी आमदार आशिष देशमुख, अधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

महानगरपालिका केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून ही मोहीम आखण्यात आली असून 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत या मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि नगर परिषद प्रशासनातर्फे या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

जिल्हास्तरावर नागपूर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर प्रशासन शाखेतर्फे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी विविध योजनांची माहिती असलेले प्रत्येकी दोन असे सहा चित्ररथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या माध्यमातून योजनांची माहिती सर्वदूर पोहोचविण्यात येणार आहे.

या चित्ररथाद्वारे केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची माहिती या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येईल. तसेच योजनांच्या लाभापासून जे नागरिक वंचित आहे, अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सुध्दा योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

यात्रेची उद्दिष्टे : आतापर्यंत लाभ न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे, विविध योजनांची जनजागृती, लाभार्थ्यांशी संवाद, त्यांचे अनुभव आणि पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ देणे, हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here