पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘चंद्रकला’ या कादंबरीचे प्रकाशन; ज्येष्ठ पत्रकार प्रा.न मा. जोशी यांची उपस्थिती

यवतमाळ, दि.१ (जिमाका) : पेशाने शिक्षिका असलेल्या चंद्रकला निंबाजीराव भगत यांच्या जीवन चरित्रावर आधारित लेखक राजाराम जाधव लिखित ‘चंद्रकला’ या कादंबरीचे प्रकाशन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. ही कादंबरी चंद्रकला भगत यांनी संघर्षातून स्वतःचे अस्तित्व निर्माण केल्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

केमिस्ट भवन येथे आयोजित या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रा. न.मा. जोशी होते. प्रमुख अतिथी डॉ.टी.सी. राठोड, प्राचार्य रमाकांत कोलते, माजी  पोलिस महानिरीक्षक हरिसिंग साबळे, निंबाजी भगत आणि चंद्रकला निंबाजी भगत हे दाम्पत्य उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. राठोड पुढे म्हणाले, लेखक राजाराम जाधव यांनी शासकीय सेवेत राहून सामाजिक प्रश्न कादंबरी आणि इतर साहित्य लेखनातून लोकांसमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांनी लिहिलेली चंद्रकला ही कादंबरी वाचनास सुरुवात केल्यास पूर्ण संपेपर्यंत वाचकांना टिकवून ठेवणारी अशीच आहे. या कादंबरीतून चंद्रकला भगत यांनी संघर्षातून स्वतःचे अस्तित्व कसे निर्माण केले याचे ज्वलंत उदाहरण आहे, असे पालकमंत्री श्री.राठोड यावेळी म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार प्रा. न. मा. जोशी म्हणाले की, लेखक राजाराम जाधव यांच्या सामाजिक लिखाणाचे कौतुक करून त्यांच्या विद्यार्थी दशेपासून आजतागायत शासनाचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणून जी कारकीर्द यशस्वीपणे पार पडली त्याचा लेखाजोखा मांडला आणि ‘चंद्रकला’ कादंबरी संदर्भात अतिशय समर्पकपणे मांडणी केली, लेखकाला पुढील लिखाणासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. ज्या व्यक्तीच्या जीवन चरित्रावर आधारित कादंबरी लिहिण्यात आली आहे, ती व्यक्ती प्रकाशन सोहळ्याला उपस्थित असणे ही महाराष्ट्रातली एकमेव घटना असेल. समाजातील भावभावना, प्रश्न मांडण्यासाठी कादंबरीचे विविध प्रकार आहेत. काव्य हे माणसाला जीवनाचा आधार देतात. काव्यामध्ये ताकद असल्याचे श्री.जोशी यावेळी म्हणाले.

चंद्रकला भगत यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या जीवनातील वास्तव मांडले. माझ्या जीवन चरित्रावर आधारित ‘चंद्रकला’ ही कादंबरी लिहिल्याबद्दल लेखक राजाराम जाधव यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. विशेष अतिथी डॉ. टी.सी राठोड यांनीही ‘चंद्रकला’ कादंबरीच्या लिखाणाबद्दल, त्यातील ओघवत्या भाषेचे कौतुक केले.

यावेळी प्राचार्य रमाकांत कोलते, हरिसिंग साबळे यांनी ‘चंद्रकला’ कादंबरी लिखाणाबद्दल लेखकाची मनोगतान प्रशंसा केली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीराजारामजी जाधव यांनी करतांना ‘चंद्रकला’ कादंबरीच्या लिखाणाबद्दलची पार्श्वभूमी विषद केली. सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले तर आभार प्रतीक जाधव यांनी केले. यावेळी नवलकिशोर राठोड, धुपचंद राठोड, हिरासिंग राठोड, प्राचार्य शांताराम चव्हाण, प्राचार्य तोताराम राठोड, दयाराम राठोड, गोवर्धन राठोड, प्रकाश जाधव, ॲड जगदीश पवार उपस्थित होते.

०००