नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 1 ‍(जि. मा. का.) :  जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षे, ज्वारी आदि पिकांची पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विविध ‍ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जावून पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांना तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार,  मिरज प्रांताधिकारी उत्तम  दिघे, उपविभागीय कृषि अधिकारी मिरज रमाकांत भजनावळे, तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे, तंत्र अधिकारी (विस्तार) एन. डी. माने,  ‍मिरज तालुका कृषि अधिकारी श्री. मिलींद निंबाळकर व तासगाव तालुका कृषि अधिकारी श्री. सर्जेराव अमृतसागर, संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, तलाठी, कृषि सहायक उपस्थित होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत चर्चा घडवून आणू व पंचनाम्याच्या अहवालानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असा ‍दिलासा दिला.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मिरज तालुक्यातील काकडवाडी, कदमवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील धुळगाव, कोंगनोळी, तासगाव तालुक्यातील कुमठे आदि ठिकाणी नुकसान झालेल्या ज्वारी व द्राक्षे पिकांची पाहणी केली. तसेच कोंगनोळी येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी सागर लक्ष्मण वावरे यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले.

000